'यंग सोच विन', प्रभादेवीत झळकले आदित्य ठाकरेंचे बॅनर

मुंबईच्या प्रभादेवी परिसरात झळकले बॅनर्स 

Updated: Oct 26, 2019, 09:16 AM IST
'यंग सोच विन', प्रभादेवीत झळकले आदित्य ठाकरेंचे बॅनर title=

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे मुंबईच्या प्रभादेवी परिसरात बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर यंग सोच विन म्हणजेच तरुण विचारांचा विजय असा आशय दिसून येतो आहे. काल वरळीत देखील आदित्य ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांकडून वेगवेगळ्या आशयाचे बॅनर लावले जात आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले आहेत.

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसैनिकांपाठोपाठ आता आमदारांनीही अशी मागणी सुरु केली आहे. शिवसेना नेतृत्व या मागणीचा विचार करणार का? आणि भाजप त्याला होकार देईल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

प्रत्यक्ष निवडणूक लढवून आमदार झालेले आदित्य ठाकरे हे पहिलेच ठाकरे. वरळीतून थेट विधानसभेत उडी घेणारे पहिले ठाकरे आता पहिल्याच प्रयत्नात ते मुख्यमंत्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. जनतेनं आशीर्वाद दिला तर नवा महाराष्ट्र घडवण्याची भूमिका त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे.

वरळीतल्या विजयानंतर मतदारसंघात शिवसेनेची जी पोस्टर लागलीत, त्यात आदित्य ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. विजयी आमदारांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी सगळ्यांनीच आदित्य यांना मुख्यमंत्री करावं, अशी आग्रही मागणी केली.

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं झाल्यास शिवसेनेकडं आणखी एक पर्याय आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेनं सरकार बनवल्यास आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जातो आहे. नेमका हाच धागा पकडून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट केलं. त्यात वाघाच्या हाती कमळ दाखवण्यात आलं आणि त्याच वाघाच्या गळ्यात चक्क घड्याळही दिसतं आहे. व्यंगचित्रकाराची कमाल... बुरा न मानो दिवाली है असं कॅप्शन राऊतांनी दिलं असलं तरी भाजपच्या जखमेवर या व्यंगचित्रानं मीठ चोळलं असेल, एवढं नक्की.