सांगलीत पतंगरावांची प्रतिष्ठा पणाला

सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्रिमंडळातल्या तीन तर केंद्रातल्या एका मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. जिल्ह्यात युतीची फारशी ताकद नसल्यामुळं दोन्ही काँग्रेसमध्येच खरी लढत होत आहे.

Updated: Jan 16, 2012, 08:18 PM IST

झी 24 ताससाठी सांगलीहून रवींद्र कांबळे

 

सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्रिमंडळातल्या तीन तर केंद्रातल्या एका मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. जिल्ह्यात युतीची फारशी ताकद नसल्यामुळं दोन्ही काँग्रेसमध्येच खरी लढत होत आहे.

 

पतंगराव कदम.....आर. आर. पाटील.....जयंत पाटील..... प्रतिक पाटील..... राज्य मंत्रिमंडळातले तीन तर केंद्रात राज्यमंत्री असलेले एक....असे तब्बल चार मंत्री असलेला राज्यातला एकमेव जिल्हा....सांगली जिल्हा परीषदेच्या आगामी निवडणुकीत या चारही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

 

62 सदस्य संख्या असलेल्या सांगली जिल्हा परिषदेत गेल्यावेळी काँग्रेसची सदस्य संख्या 30 अधिक एक अपक्ष अशी 31 होती, तर राष्ट्रवादीच्या बाजुला 28 अधिक 3 अपक्ष असे 31 सदस्य होते.

 

सुरूवातीला एका अपक्षानं काँग्रेसला साथ दिल्यानं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा झाला. मात्र अडीच वर्षानंतर आठ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिल्यानं झेडपीचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा झाला. यावेळीही काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी सांगली झेडपीत स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय.

 

पतंगराव कदम यांनी बोलावलेल्या बैठकीत प्रतिक पाटील यांना न बोलावल्यानं दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पतंगराव मात्र काँग्रेसमध्ये गटबाजी नसल्याचं सागतायेत.

 

राष्ट्रवादीनं निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते अजित घोरपडे यांना पक्षात घेऊन काँग्रेसला धक्का दिलाय. काँग्रेस नेते राष्ट्रवादीत आल्यानं यावेळी झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा निर्विवादपणे फडकेल असा विश्वास नेत्यांना वाटतोय. तब्बल चार मंत्र्यांनी प्रतिष्टा पणाला लावल्यामुळं सांगली जिल्हा परिषदेच्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय.

 

Tags: