www.24taas.com, मुंबई
देशातली प्रमुख व्यक्तिमत्व ब्रँड आहेत असं गृहित धरून त्यांना विश्वासार्हतेच्या निकषावर तपासलं तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथम स्थान प्राप्त करतात. सर्वसामान्य ग्राहकांसाठी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, महेंद्रसिंह धोनी आणि रतन टाटा यासारख्या रथीमहारथींच्या स्पर्धेत अण्णा अधिक विश्वासपात्र असल्याचं सिद्ध झालं आहे.
ट्रस्ट रिसर्च ऍडवायजरी ने केलेल्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट-२०१२ या सर्वेक्षणानुसार हा निष्कर्ष काढला आहे. देशभरातील ग्राहकांनी व्यक्तिमत्वांच्या ब्रँडसमध्ये अण्णांना पहिल्या क्रमांकाची पसंती दिली. देशातील १००० विश्वासार्ह ब्रँडसमध्ये २२ व्यक्तीमत्वांचा समावेश करण्यात आला.
अण्णा यात दुसऱ्या क्रमांकावर आले आणि ते सचिन तेंडुलकरच्या तुलनेत १३० अंकांनी आघाडीवर आहेत. या सर्वेक्षणाचे निकाल आश्चर्यचकित करणारे आहेत. बॉलिवूडमधील सलमान खान हा आमिर खान, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह असल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण ब्रँडसच्या यादीत अण्णा हजारे १०६ तर सचिन तेंडुलकर २३४ स्थानावर आहे.
सर्वेक्षणानुसार भारतात मोबाईल हँडसेटची निर्माती नोकिया सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड असल्याचं निष्पन्न झालं आहे. नोकियाने टाटांना दुसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर टाकलं आहे. एलजीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर कोरियन कंपनी सॅमसंग चवथ्या तर सोनी पाचव्या स्थानावर आहे. हे सर्वेक्षण मागील वर्षी करण्यात आलं. या सर्वेक्षणात १५ शहरातील २७०० लोकांचा सहभाग होता आणि १७,००० ब्रँडसचा विचार करण्यात आला.