खंडुरींची झुंज अखेर व्यर्थच....

उत्तराखंडमध्ये निकाराच्या झुंजीत काँग्रेसने भाजपपेक्षा अवघी एक जागा जास्त जिंकली असली तरी त्यांना बहुमत प्राप्त करता आलेलं नाही. काँग्रेसला ३२ जागा तर भाजपने ३१ जागांवर विजय मिळवला, बसपाच्या वाट्याला तीन तर इतरांनी चार जागा जिंकल्या आहेत.

Updated: Mar 7, 2012, 08:23 AM IST

www.24taas.com, डेहराडून
उत्तराखंडमध्ये निकाराच्या झुंजीत काँग्रेसने भाजपपेक्षा अवघी एक जागा जास्त जिंकली असली तरी त्यांना बहुमत प्राप्त करता आलेलं नाही. काँग्रेसला ३२ जागा तर भाजपने ३१ जागांवर विजय मिळवला, बसपाच्या वाट्याला तीन तर इतरांनी चार जागा जिंकल्या आहेत.

 

सद्य परिस्थितीत तरी पुढचं सरकार कोण स्थापन करणार याबाबत अनिश्चितता आहे. संकेतानुसार राज्यपाल सर्वाधिक जागा प्राप्त करणाऱ्या पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. काँग्रेसला बहुमतासाठी बसपा आणि अपक्षांना आपल्याकडे खेचावं लागंल तरच त्यांना सरकार स्थापन करता येईल. उत्तराखंडमधल्या मतदारांनी स्पष्ट कौल कुणालाही दिलेला नाही.

 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री बी.सी.खंडूरी यांचा काँग्रेसच्या एस.एस.नेगी यांनी कोटद्वारमध्ये केलेला पराभव धक्कादायकच म्हणावा लागेल. एग्झिट पोलनुसार लोकांनी खंडूरी यांना निवडणुका होत असलेल्या पाचही राज्यांमधले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री अशी पसंती दिली होती. त्यामुळेच प्रामाणिक माणसाला राजकारणात तग धरणं कठिण जातं याचा अनुभव परत एकदा आला आहे.

 

उत्तराखंडमध्ये लोकायुक्त विधेयक आणि सार्वजनिक सेवा हक्क विधेयक सरकारने पारित केलं होतं. देशात सर्वात सशक्त आणि प्रभावी लोकपाल विधेयक उत्तराखंडमध्ये पारित करण्यात आलं. पण भ्रष्टाचारविरोधात घेतलेली कठोर भूमिकाही भाजपला तारू शकली नाही. लोकांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकली नाही हेच निकालांवरुन दिसून येत आहे.

 

भाजप केवळ काँग्रेसचा मुकाबला करत होती असं नव्हे तर पक्षांतर्गत खंडूरी आणि माजी मुख्यमंत्री निशंक यांच्यातला संघर्षही त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. खंडूरी यांचा स्वच्छ कारभार भाजपला जिंकून देऊ शकला नाही. त्यांच्या आधी मुख्यमंत्री असलेल्या निशंकंच्या कारकिर्दीत एकाहून एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणलं होतं. त्यामुळेच निशंक यांना हटवून खंडूरी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं देण्यात आली. खंडूरी यांनी निशंकंच्या भ्रष्ट कारभाराला आळा घातला पण तरीही खूप उशीर झाला होता. खंडूरी यांच्या नेतृत्वामुळेच भाजपने काँग्रेसला काँटे की टक्कार दिली हे मात्र खरं.