www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आणि त्या चर्चेनंतर त्रिवेदीं राजीनामा देण्यास तयार झाले.
याआधी ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याची मागणी लेखी केली तरच राजीनामा देऊन अशी भूमिका त्रिवेदी यांनी घेतली होती. त्यानंतर ममतांनी केंद्र सरकारला २४ तासांचं अल्टिमेटमही दिलं होतं. २४ तासात त्रिवेदींचा राजीनामा घेतला नाही तर केंद्र सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करण्याचा इशारा ममतांनी दिला होता.
त्यानंतर ममतांनी स्वतः त्रिवेदींशी फोनवरुन चर्चा केली आणि वादावर अखेर पदडा पडला. मुकुल रॉय हे नवे रेल्वेमंत्री होण्याचे संकेत आधीच तृणमुल काँग्रेसनं दिले आहेत.
रेल्वे अर्थसंकल्पातल्या भाडेवाढीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदींवर चांगल्याच संतापलेल्या होत्या. आता त्रिवेदींना हटवून त्यांच्या जागेवर मुकुल रॉय हे नवे रेल्वे मंत्री असतील असं बॅनर्जी यांनी सांगितलं होतं.
त्रिवेदी हे आमचे रेल्वेमंत्री नाहीत. त्रिवेदींबाबत सरकारने काय तो निर्णय घ्यावा असं सांगत पुढचे रेल्वे मंत्री मुकुल रॉय असतील असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याची लेखी मागणी केली तरच राजीनामा देणार अशी भूमिका दिनेश त्रिवेदी यांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. ममता बॅनर्जी यांचे जवळचे मानले जाणारे कल्याण बॅनर्जी यांनी आज त्रिवेदींना फोन करुन राजीनामा देण्याची सूचना केली होती.
मात्र कल्याण बॅनर्जी यांच्या फोनवरुन राजीनामा देणार नाही तर ममता बॅनर्जी यांनी लेखी स्वरुपात राजीनाम्याची मागणी केली तरच राजीनामा देऊ अशी भूमिका त्रिवेदी यांनी घेतली होती.