आपल्या घरात येणारं दूध मग ते पॅकबंद थैलीतलं असलं तरी शुद्धच असेल या भ्रमात कुणी राहू नये. कारण `फुड सेफ्टी स्टॅण्डर्ड अँथॉरीटी ऑफ इंडिया`ने देशभरात घेतलेलं सर्व्हेक्षण धक्कादायक आहे. ३३ राज्यांमध्ये घेतलेल्या सर्व्हेक्षणात ६५ टक्के दूधामध्ये भेसळ होत असल्याचं चाचणीमधून सिद्ध झालं आहे.
सर्वाधिक म्हणजे १०० टक्के पं. बंगाल, ओरीसा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये त्या खालोखाल गुजरात ८९ टक्के, जम्मू काश्मीर ८३ टक्के पंजाब ८१ टक्के, राजस्थान ७६ टक्के तर महाराष्ट्रात ६५ टक्के दूधात सर्रास भेसळ होत असल्याचं उघड झालं आहे. गोव्यात मात्र अजिबात भेसळ होत नाही. तर आंध्रप्रदेशामध्येही कमी म्हणजे साडेसहा टक्केच भेसळ होत असल्याची माहिती आहे. दुधाच्या पॅकबंद थैलीतून इंजेक्शनद्वारे दूध काढून त्यात बनावट दूध भरलं जातं. त्यासाठी युरीया, सोया, डिटर्जेंट आणि ग्लुकोजचा वापर केला जातो. अशा प्रकारे एका शुद्ध पिशवीतल्या दुधापासून दोन ते तीन पिशव्या बनावट दूध तयार केलं जातं. या दूधाचा शरीरावर अत्यंत गंभीर परीणाम होऊ शकतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रक्तदाबासह किडनी, अन्ननलिकेवर परिणाम होऊ शकतो. पोटाला सूज येऊ शकते. गर्भवती महिलांची प्रकृती बिघडू शकते. अशा बोगस दूधाच्या सेवनानं बाळाची वाढ खुंटू शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. घरी रंग आणि वासावरुन आपण भेसळयुक्त दूध ओळखू शकतो. अन्यथा सरकारी प्रयोगशाळेत दूधाची चाचणीही घेऊ शकतो. दूधाची भेसळ रोखण्यात महाराष्ट्रसह ९० टक्के राज्ये अपयशी ठरल्याचं गंभीर चित्र या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. आता केंद्र सरकार काय पाऊलं उचलणार हेच महत्वाचं आहे.