www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपती निवडणूक पदाची निवडणूक रंगदार होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले माजी लोकसभा अध्यक्ष पूर्णो संगमा यांना अधिकृतपणे पाठिंबा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि संगमा यांच्यातील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
यूपीएने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडताना आमच्याशी चर्चा केली नाही. राष्ट्रपतींची निवड सर्वसहमतीने हवी होती तर यूपीएने उमेदवार घोषीत करताना विरोधी पक्षांनाही विश्वासात घेणे आवश्यक होते, तसे झालेले नाही. त्यामुळे संगमा यांना पाठिंबा देण्याचा घटक पक्षांच्या सहमतीने घेतल्याचे सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने प्रणव यांना पाठिंबा दिल्याने वेगळी गणिते असल्याचे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादीने काँग्रेसला शह देण्यासाठी संगमा यांना छुपा पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी हा केंद्र सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागले आहे. काँग्रेसचे मुखर्जी यांना जरी संधी असली तरी संगमा यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे. संगमा यांना शिवसेना आणि जेडीयुचा विरोध आहे. तर भाजपला अकाली दलाचा पाठिंबा आहे.
भाजपने जरी आपला उमेदवार न उतरवता संगमा यांना पाठिंबा दिला तरी एडीएमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी बोलणे झाल्यानंतर संगमा यांनी केंद्रातील सत्ताधारी यूपीएचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत यूपीएचेच राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणब मुखर्जी यांच्याशी लढा देण्याचा निर्धार केला.
शिवसेना, जेडीयु आणि अकाली दलाच्या विरोधाची पर्वा न करता भाजपने संगमा यांच्या उमेदवारीचे समर्थन करण्याचे ठरविले आहे.
आदिवासी नेते म्हणून संगमा यांच्या उमेदवारीचे आदिवासीबहुल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी यापूर्वीच समर्थन केले आहे, तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही संगमांना पाठिंबा दिला आहे. संगमांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजप-रालोआमध्ये फूट पडली असून शिवसेनेने प्रणब मुखर्जीना पाठिंबा दिला आहे, तर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारीवरून जदयुचे भाजपशी बिनसले आहे.
शिवसेनेपाठोपाठ जदयुदेखील संगमांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. संगमांच्या बाबतीत अकाली दलाची भूमिका स्पष्ट झालेली नाही. पण मित्रपक्षांची भूमिका काहीही असली तरी संगमांना पाठिंबा देण्याचा निर्धार भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत घेण्यात आला असून त्याविषयीची औपचारिक घोषणा आज सुषमा स्वराज यांनी केली. प्रणब मुखर्जी यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बनर्जी यांचेही संगमा यांच्या उमेदवारीला समर्थन मिळणार नाही. डावे पक्ष उद्याच्या बैठकीत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे प्रणब मुखर्जीविरुद्धची संगमा यांची लढत प्रतीकात्मकच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.