www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा परिषदेतही मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देणार आहे. एवढच नाही तर आघाडीसोबत सत्तेतही सहभागी होणार आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडं, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं तर मनसेला दोन समित्या मिळणार आहेत. औरंगाबाद झेडपीत ६० सदस्य असून मॅजिक फिगरसाठी ३१ सदस्यांची गरज आहे.
आघाडीकडं २९ जागा असून मनसेच्या आठ सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यास मॅजिक फिगर सहज पार होणार आहे. आघाडी आणि मनसे सोबत आल्यामुळं १० वर्षांची युतीची झेडपीतली सत्ता जाणार आहे.
ठाणे महापालिका आणि झेडपी नंतर आता औरंगाबाद झेडपीत मनसेनं शिवसेनेला धक्का दिला आहे. मनसेनं शिवसेनेला दे धक्का देत आघाडीला पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे. यामुळं औरंगाबादमध्ये असलेली युतीची १० वर्षांची सत्ता संपुष्टात येणार असल्याचंचं दिसून येतं आहे.
दुसरीकडे दहा वर्षांपासून असलेली सत्ता राखण्यासाठी शिवसेनेनंही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीकडे २३, आघाडीकडे अपक्षांसह २९, तर मनसेकडे ८ जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३१ ही मॅजिक फिगर ठरणार आहे. नाशिकचा बदला घेण्यासाठी शिवसेनेला काहीही करून सत्तेपासून दूर ठेवायचा चंग मनसेनं बांधल्याचं बोललं जातं आहे. आघाडीने मनसेला दोन सभापतीपदंही देण्याचं निश्चित केलं आहे.