मुख्याध्यापक तुपाशी, विद्यार्थी मात्र उपाशी

वांगणीच्या एका शाळेतल्या मुख्याध्यापकानं शाळेसाठीचा लाखोंचा निधी हडप केला आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहाराच्या निधीवरही त्यानं डल्ला मारला आहे.

Updated: May 10, 2012, 09:25 AM IST

www.24taas.com, वांगणी

 

वांगणीच्या एका शाळेतल्या मुख्याध्यापकानं शाळेसाठीचा लाखोंचा निधी हडप केला आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहाराच्या निधीवरही त्यानं डल्ला मारला आहे. मुख्याध्यापक तुपाशी आणि विद्यार्थी उपाशी असलाच हा प्रकार. अंबरनाथ तालुक्यातल्या गोरेगावमधली जिल्हा परिषदेची उर्दू शाळा.

 

शाळेचं छप्पर उडालेलं. शाळेची अवस्था अतिशय दयनीय. शाळेच्या दुरुस्तीसाठी केंद्राच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत ६ लाख ७० हजार रुपये मंजूर झाले होते. ही रक्कम सहा महिन्यांपूर्वीच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमाही झाली. मात्र  याच शाळेचे मुख्याध्यापक नसीर खान यांनी या निधीतला ६ लाख ६० हजार रुपयांचा निधी तीन महिन्यांच्या अंतरानं बँकेतून स्वतःसाठीच परस्पर काढला.

 

इतक्यावरच ते थांबले नाहीत तर शालेय पोषण आहारासाठीचा ५८ हजरांचा निधीही त्यांनी ह़डपला. शाळेच्या केंद्र प्रमुखांनीही मुख्याध्यापक नसीर खान यांनी अपहार केल्याचं मान्य केलं आहे. सदर मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. आता पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला असताना, शाळेची दुरुस्ती झालेलीच नाही. मुख्याध्यापकांनी लाखोंचा मलिदा खाल्ला आहे, आणि विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर शिक्षण घ्यावं लागणार आहे.