www.24taas.com, चंद्रपूर
चंद्रपूर मनपातील वातावरण सध्या तापलंय. पण ही गरमागरमी राजकीय कारणावरून नाही तर ती आहे कुत्र्यांवरून. शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झालीय. महापौरांनी कुत्रे पकडण्यासाठी नव्या वाहन खरेदीचे आदेश दिले. मात्र या आदेशाला मनपा प्रशासनानं धुडकावलंय. त्यामुळे महापौर रूसल्या आहेत.
चंद्रपूरच्या महापौरांनी प्रतिज्ञा घेतली आहे की कुत्र्यांना नवं वाहन येईपर्यंत मीदेखील नवं वाहन वापरणार नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सध्या गंभीर बनलाय. या श्वानांनी आतापर्यंत १६ जणांना चावे घेतलेत. श्वान पकडण्याचं वाहन नादुरुस्त असल्यानं महापौरांनी नवीन वाहन खरेदी करण्याचे आदेश दिले. त्यावर प्रशासनानं २ 'फियाट लिनिया' या अलिशान गाड्या खरेदी करण्याची सूचना केली. एक महापौरांसाठी तर दुसरी आयुक्तांसाठी...त्यानंतर वाहन खरेदीसाठी लगेचच सूत्रे हलली. पण श्वान पकड वाहन कागदावरच राहिलं.
महापौर संगिता अमृतकर यांना ही बाब कळताच त्यांनी नाराजी जाहीर करत तिरीमिरीत प्रतिज्ञाच घेऊन टाकली की कृपया जोवर कुत्र्यांची गाडी येत नाही तोवर मी नव्या गाडीत बसणार नाही.
चंद्रपूर मनपा नवी असली तरी महापौर विरुद्ध आयुक्त संघर्ष एखाद्या जुन्या मनपा सारखाच मुरलेला आहे. कुत्र्यांच्या आडून एकमेकांवर वार केले जात आहेत. या वादात सर्वसामान्यांच्या नशिबी मात्र कुत्र्यांचे चावे आलेत.