'हिवाळी अधिवेशना'मुळे दुकानदाराला मनस्ताप

हिवाळी अधिवेशनातल्या झेरॉक्सचे ११ लाखांचे बिल मिळाले नाही म्हणून, एका व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. संजय पोहरे असं या व्यावसायिकाचं नाव असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळं त्यांचं दोन वर्षांपासूनच ९ लाखांचं बिल थकलंय.

Updated: Apr 12, 2012, 08:03 AM IST

www.24taas.com, अखिलेश हळवे

हिवाळी अधिवेशनातल्या झेरॉक्सचे ११ लाखांचे बिल मिळाले नाही म्हणून, एका व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. संजय पोहरे असं या व्यावसायिकाचं नाव असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळं त्यांचं दोन वर्षांपासूनच ९ लाखांचं बिल थकलंय.

संजय पोहरे या व्यावसायिकाला २०१० च्या हिवाळी अधिवेशना दरम्यान झेरॉक्स प्रती पुरवण्याचं काम मिळालं होतं. त्या प्रमाणं अधिवेशनाच्या १७ दिवसांच्या कालावधीत २५ मशिनच्या सहाय्यानं त्यानं मागणी पूर्ण केली. काम केल्याची ११ लाख ४० हजार ५२८ रुपयांची बिलं त्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली.

दोन शासकीय कार्यालया दरम्यानच्या टोलवाटोलवीनं संजयला मनस्ताप सहन करावा लागला. बिलांना मोठ्या प्रमाणात कात्री लावली गेली. अंतरीम मदत म्हणून ३ लाख ५ हजार ४९६ इतकी रक्कम देण्यात आली. पुढे संजयला आणखी एक धक्का बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेली ७७, १७१ रुपयांची रक्कम परत करण्याचे आदेश त्याला मिळाले. ही जादा रक्कम असल्याचं प्रशासनांचं म्हणणं होतं. अखेर निराश झालेल्या संजयनं आपल्या दुकानात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उघडपणे बोलण्याचं टाळलं असलं तरी कंत्राटातील नियमांप्रमाणे बील मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मात्र ते पैसे वेळेत न मिळाल्यास आणि असा जिवघेणा मनस्ताप सहन केल्यानंतर प्रशासनाला जाग आल्यास उपयोग काय, असा सवाल केला जातोय ?