जिल्हाधिकारी कार्यालयातून संगणकांची चोरी

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सात संगणक चोरीला गेलेत. विशेष म्हणजे नाशिकमधलं बोगस व्होटिंग कार्डांचं प्रकरण उघड होताच हे संगणक चोरीला गेलेत. त्यामुळे बोगस व्होटिंग कार्ड घोटाळा सरकारी आशीर्वादानंच झाला की काय, याचा संशय बळावलाय.

Updated: Feb 27, 2012, 10:51 PM IST

www.24taas.com, नाशिकहून योगेश खरे

 

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सात संगणक चोरीला गेलेत. विशेष म्हणजे नाशिकमधलं बोगस व्होटिंग कार्डांचं प्रकरण उघड होताच हे संगणक चोरीला गेलेत. त्यामुळे बोगस व्होटिंग कार्ड घोटाळा सरकारी आशीर्वादानंच झाला की काय, याचा संशय बळावला आहे.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाची ही इमारत.... जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांतल्या मतदारांचे रेकॉर्डस याच कार्यालयातल्या संगणकांमध्ये होते. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यालयातल्या सात संगणकांची चोरी झालीय. मतदार ओळखपत्र आणि मतदारांचा महत्त्वाचा डाटाबेस या संगणकांमध्ये होता. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेत बोगस व्होटिंग कार्डांचा वापर झाल्याचं उघड होताच ही घटना घडलीय. बोगस व्होटिंग कार्डस नायब तहसीलदार आणि कर्मचा-यांच्या मदतीनं तयार करण्यात आली होती, असा आरोप होताच ही चोरी झालीय.

बोगस व्होटिंग कार्डांचं प्रकरण कन्हैय्या परदेशी यानं उघड केलं होतं. शुक्रवारी कन्हैया परदेशी निवडणूक अधिका-यांना भेटताच शनिवारी या संगणकांची चोरी झाली. त्यामुळे बोगस व्होटिंग कार्डांबद्दलचा संशय बळावला.

धुळे महापालिकेतला जकातीचा गैरव्यवहार दडपण्यासाठी रेकॉर्ड रुम जाळण्याचा प्रकार घडला होता. तर यापूर्वीही विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती. वारंवार अशा घटना घडूनही कुठलाच धडा यातून घेतला जात नाहीय. असे प्रकार रोखणं सोडाच, उलट सरकारी आशीर्वादानंच असे प्रकार होतायत की काय, याबद्दलच संशय वाढत चालला आहे.