सीसीटीव्हीवर भारी नाशिकचे चोर!

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लाऊनही नाशिकमधली गुन्हेगारी नियंत्रणात येत नाहीय. सीसीटीव्हीसह इतर तांत्रिक यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचं समोर आलं आहे. मग यंत्रणेवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Updated: Nov 1, 2011, 12:52 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लाऊनही नाशिकमधली गुन्हेगारी नियंत्रणात येत नाहीय. सीसीटीव्हीसह इतर तांत्रिक यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचं समोर आलं आहे. मग यंत्रणेवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

 

नाशिकमधल्या गंगापूर परिसरातल्य़ा एस टी कॉलनीतल्या गुप्ते यांच्या घरामध्ये २४ जुलैला पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरामधलं कपाट फोडलं. मुद्देमालासह काही रोकड लंपास करुन चोरटे पसार झाले. सीसीटीव्हीमध्ये चोर स्पष्ट दिसत असून पोलीस अजूनही त्यांना गजाआड करु शकलेले नाहीत. चोरांची साधी ओळखही अजून पटू शकलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलीस चोरांना पकडू न शकल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येतेय.सीसीटीव्ही फुटेज असलं तरी चोरांच्या चेहऱ्याचे डिजिटल रेकॉर्डस, बोटांचे ठसे आणि खाणाखुणांचे बारकावे याची संगणकीय पडताळणी होऊ शकत नाही. वाहतूक पोलिसांनीही सीसीटीव्ही लावले होते. मात्र हे सीसीटीव्हीसुद्धा अपेक्षित कामगिरी करत नसल्याचं समोर आलंय.

 

सीसीटीव्ही जर अपेक्षित कामगिरी करत नसतील तर केवळ सीसीटीव्ही विक्रेत्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी हा खटाटोप आहे का, असा प्रश्न सहाजिकच उपस्थित केला जातोय. गृहमंत्री सीसीटीव्ही यंत्रणा पाहण्यासाठी स्कॉटलंडमध्ये जाऊन आले. त्यामुळे अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याआधी आहेत ते सीसीटीव्ही काम करतायत का, ते तपासून पाहणं महत्त्वाचं आहे.