अतिक्रमण विरोधी कारवाईला हिंसक वळण

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणानं सुरु केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आज हिंसक वळण लागलं. नागरिकांनी कारवाई विरोधात तुफान दगडफेक करत विरोध दर्शवला. यावेळी काही नागरिक जखमी झाले. त्यामुळं पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकर वाडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Updated: Jun 2, 2012, 11:47 PM IST

www.24taas.com, पुणे

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणानं सुरु केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आज हिंसक वळण लागलं. नागरिकांनी कारवाई विरोधात तुफान दगडफेक करत विरोध दर्शवला. यावेळी काही नागरिक जखमी झाले. त्यामुळं पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकर वाडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

ही दृश्य पाहिल्यावरच लक्षात येतं असेल की पिंपरी-चिंचवड मधल्या वाल्हेकरवाडी मधल्या नागरिकांमध्ये किती संताप आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण गेल्या काही दिवसांपासनं बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोजर चालवतंय. त्याच उद्देशानं वाल्हेकर वाडीतल्या मंगल कार्यालयावर कारवाई करण्यासाठी अधिकारी गेले होते. वाल्हेकर वाडीतल्या आहेर मंगल कार्यालयावर कारवाई होणार होती. दरम्यान, आपल्याही घरावर कारवाई होईल, या भितीनं घाबरलेल्या नागरिकांनी तुफान दगडफेक करत संताप व्यक्त केला. त्यात काही नागरिक जखमी झाले.

दगडफेक झालेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वाल्हेकरवाडी कडे जाणारे मार्गही पोलिसांनी बंद केले. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर अतिक्रमण विरोधी  कारवाई पार पडली. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणानं अतिक्रमण हटाव मोहीम अधिक गांर्भीयानं घेतल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. येत्या काही दिवस ही कारवाई अशीच चालू रहाणार असल्याच प्राधिकरणानं स्पष्ट केलय.