www.24taas.com, कैलास पुरी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात कायमस्वरुपी नोकरी मिळेल या आशेने कंत्राटी तत्वावर काम करणा-या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रशासनानं क्रूर चेष्टा केल्याचं समोर आलंय. कामावर कायमस्वरुपी करण्याऐवजी त्यांना नोकरीवरुनच काढून टाकण्यात आलंय. कारण त्यांनी नियमबाह्य झालेली भरतीविरोधात आवाज उठवला होता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात बाळासाहेब कांबळे, सुशीला बरई आणि विजया घागरे हे तिघेजण कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. गेल्या महिन्यात पालिका रुग्णांलयांमध्ये कायमस्वरुपी वैद्यकीय अधिका-यांची भरती सुरु झाल्यावर या तिघांनीही अर्ज केले. परंतु प्रशासनानं अनेक नियमांचं अडथळे दाखवत कायमस्वरुपी केलं नाही. तर दुसरीकडं मात्र पालिकेतल्या अधिका-यांनी जवळच्या लोकांना संधी दिल्याचं सांगण्यात येतंय. धक्कादायक बाब म्हणजे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिक्षक आनंद जगदाळे यांची सून स्नेहा पावसे हिची नियम डावलून नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात येतोय.
डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेत झालेला हा घोटाळा केल्याच्या बदल्यात या तिघांनाही प्रशासनानं थेट कामावरुनच काढून टाकलंय. पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिका-यांना मात्र यामध्ये काहीही गैर वाटत नाहीय.
प्रशासन काहीही दावा करत असलं तरी या तिघांना का काढून टाकण्यात आलं. हे उघड गुपित आहे. तर वैद्यकीय अधिक्षकाच्या सुनेची झालेली नियुक्ती कोणत्या निकषांवर करण्यात आली. हे समोर येण्याबरोबरच या तिघा डॉक्टरांवरील अन्यायही दूर होणं गरजेचा आहे.