पुण्याचं पाणी कुठे मुरलं?

पुण्यातलं पाणी आता चांगलंच पेटायला लागलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातल्या 9 TMC पाण्याचा हिशोबच लागत नाहीय. पुण्याचं पाणी नक्की गेलं कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Updated: Mar 1, 2012, 08:53 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यातलं पाणी आता चांगलंच पेटायला लागलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातल्या 9 TMC पाण्याचा हिशोबच लागत नाहीय. पुण्याचं पाणी नक्की गेलं कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातल्या पाणीसाठ्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.

 

RTI कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार १ ऑक्टोबर रोजी धरणामध्ये 28.27 TMC पाणी होतं. फेब्रुवारी अखेर म्हणजे पाच महिन्यांत महापालिकेनं यामधलं 7.75 TMC पाणी वापरलं तर 1.14 TMC पाण्याचं बाष्पीभवन झालं म्हणजे धरणामध्ये आज 21.25 TMC पाणी शिल्लक असणं अपेक्षित आहे.  पण सध्या धरणामध्ये 11.50 TMC च पाणी उरलं आहे. त्यामुळे 9 TMC पाणी गेलं कुठे असा प्रश्न विचारला जातोय.

 

RTI कार्यकर्त्यांनी यात शेतीसाठीचं पाणी गृहीत धरलेलं नाही. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार 15 ऑक्टोबर रोजी 27.40 TMC पाणीसाठा शिल्लक होता. त्यापैकी शेतीसाठी 7. 24 TMC पाणी वापरण्यात आलं. पिण्यासाठी महापालिकेनं 7.25 TMC पाणी वापरलं आणि 1.14 TMC पाण्याचं बाष्पीभवन झालं. त्यामुळे आज 11.50 TMC पाणी शिल्लक आहे.

 

RTI कार्यकर्ते आणि जलसंपदा विभागातल्या या तफावतीचं कारण आहे ते शेतीसाठी सोडलेलं पाणी....  निवडणुकांच्या काळात शेतीसाठी सलग पंचावन्न दिवस पाणी सोडण्यात आलं होतं. इतर वेळी शेतीसाठी एक महिन्याचं आवर्तन असतं. पण निवडणुकांच्या तोंडावर शेतक-याला खूष करण्यासाठी पाण्याचे पाट वहात राहिले. परिणामी विनाकारण पाणी वाया गेलं आणि पुणेकरांवर पाण्याचं संकट कोसळलं.