झी २४ तास वेब टीम, मुंबई
अखेर लवासाला पर्यावरण मंत्रालयाने सशर्त परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील १५,००० एकर जमीनिवर उभं राहत असलेला लवासा प्रकल्प पहिल्यापासूनचा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. लवासावर प्रदूषण मंडळाला खटला भरण्याची दिलेली परवानगी एका अर्थाने लवासाच्या पथ्यावर पडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती ती अटकळ खरी ठरली.
लवासाच्या पहिल्या टप्प्याला अखेर परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने पर्यावरण मंत्रालयाकडे यासंदर्भात विनंती केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर अण्णा हजारेंनी याबाबतीत हल्लाबोलही चढवला होता. दिल्ली इथे चव्हाणांनी यासंदर्भात पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांना आपण विनंती केली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं तेंव्हा त्यांच्या बदलेल्या भूमिकेबदद्दल अनेकांना धक्का बसला होता.
त्याच्या आदल्या दिवशी कृषी मंत्री शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प राज्याच्या उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. गेल्या दीड वर्षांपासून लवासा बांधकामाला स्थगिती होती.