www.24taas.com, बीड
परळी बीड संशयित स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला आंबेजोगाई सेशन कोर्टानं आणखी एक दणका दिलाय. २०१० साली झालेल्या गर्भपात प्रकरणात महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. मुंडेला दिलेला जामीन रद्द करण्यात आलाय.
२०१० सालीही मुंडे हॉस्पिटलमध्ये गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी याप्रकरणात डॉ. मुंडेला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता तोच गुन्हा पुन्हा केल्यानं डॉ. मुंडेचा जामीन रद्द करण्यात आलाय. जामिनातल्या अटींचा भंग केल्याचं कारण यासाठी देण्यात आलंय. राज्य सरकारनं यासंबंधात कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टानं हा निर्णय दिलाय.
काही दिवसांपूर्वीच विजयमाला व्हटेकर या महिलेचा गर्भापातावेळी मृत्यू झाल्यानं सुदाम मुंडे पुरता अडचणीत सापडलाय. पण याही प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर जामीन मंजूर झाला होता. हा स्त्री भ्रूण हत्येचा प्रयत्न असल्याचं तपासाच्या वेळी पुढे आलं. त्यानंतर डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे हे फरारी आहेत. झी २४ तासनं या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता आणि सातत्यानं पाठपुरावाही केलाय. आता कोणत्याही क्षणी सुदाम मुंडेला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. कालच मुंडे याचे परळीतील हॉस्पिटलही सील करण्यात आलंय.