www.24taas.com, मुंबई
विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रातल्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षीस देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला प्रोत्साहन द्या अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता कबड्डीपटू महिलांसाठी अजित पवार हे सरसावले आहेत.
भारतात क्रिकेटइतकी प्रसिद्धी कबड्डीला मिळालेली नाही मात्र तरीही महाराष्ट्राच्या मातीतील असणारा हा खेळ वृद्धिंगत व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कबड्डीपट्टू महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन कबड्डीला आणखी प्रसिद्धी दिली जाण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा आहे.
भारतीय महिला कबड्डी टीमने पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलं होतं. फायनलमध्ये भारतीय महिला टीमने इराणला २५-१९ ने पराभूत करत वर्ल्ड कपच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती.
ममता पुजारीच्या कॅप्टन्सीखालील भारतीय टीम या वर्ल्ड कपमध्ये एकाही मॅचमध्ये पराभूत झाली नाही. या वर्ल्ड चॅम्पियन टीममध्ये महाराष्ट्राकडून तीन खेळाडू सहभागी झाल्या होत्या. मुंबईची सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे आणि पुण्याची दिपीका जोसेफ या तीन खेळाडू या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाल्या होत्या.