www.24taas.com, युक्रेन
वर्ल्ड चॅम्पियन आणि युरो चॅम्पियन फ्रान्सला ग्रुप डीच्या अखेरच्या मॅचमध्ये स्विडनकडून २-० अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं. मात्र, या पराभवानंतरही फ्रान्सने क्वार्टर फायनलमधील आपली सीट याआधीच बूक केली होती. स्विडनच्या या विजयाचे हिरो ठरले ते कॅप्टन इब्राहिमोविच आणि लार्सन...
सलग 23 मॅचेसमध्ये विजयाची नोंद करणारी फ्रान्सीसी टीम, स्विडनला पराभूत करून 24व्या विजयाची नोंद करण्याकरता किव्ह स्टेडियममध्ये उतरली खरी. मात्र, जे आक्रित मैदानावर घडलं ते सर्वांना बुचकळ्यात पाडणारं होतं. युरो कपमधील आव्हान संपुष्टात आलेल्या स्विडनने फ्रान्सचा २-० ने पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत लीगमध्ये एक विजय आणि एका ड्रॉ मॅचसह खेळणा-या फ्रान्समोर स्विडनचा कितपत निभाव लागणार यावरच चर्चा रंगलेली होती. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या फ्रान्सने धडाक्यात सुरूवात केली. पण स्विडीश डिफेन्सने फ्रान्सच्या गोल करण्याच्या अनेक चाली उधळून लावल्या. रिबेरो आणि बेंझेमा यांनीही अनेकदा गोल करण्याच्या संधी गमावल्या. अखेर फर्स्ट हाफ बरोबरीत सुटल्यानंतर सेकंड हाफमध्ये स्विडीश टीमने फाईटबॅक करायला सुरूवात केली. सलग दोन पराभव सहन केलेली स्विडीश टीम, युरोमधुन एक्झिट घेण्यापूर्वी एक विजय मिळवण्यासाठी उत्सुक होती. अखेर ५४व्या मिनिटाला स्कँडेनेव्हियन कॅप्टन इब्राहिमोविचने अप्रतिम गोल करत स्विडनला आघाडी मिळवून दिली आणि फ्रान्सिसी फॅन्सच्या छातीत धस्स झालं. फ्रान्सचा गोलकीपर लॉरिसच्या डोळ्याचे पाते लवते न लवते तो विद्युत वेगाच्या चपळाईने इब्राहिमोविचने मारलेला शॉट गोलपोस्टमध्ये जाऊन विसावला आणि स्टेडियममध्ये स्विडीश फॅन्सनी दिवाळी साजरी केली.
आधीच गोल करण्यात येत असलेलं अपयश आणि स्विडिश टीमने भेदलेल्या डिफेंसमुळे फ्रान्सच्या टीमवर आपोआपच दबाव आला. नंतर त्यांनीही या धक्क्यातून सावरत स्विडीश गोलपोस्टवर हल्ले चढवले. मात्र, त्यांचे सर्व लाँग रेंज शॉट्स गोलपोस्टच्या बाजूने गेले. १-० ने आघाडीवर असणा-या स्विडनला एक्स्ट्रा टाईममध्ये पुन्हा एकदा गोलचा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. होलमंडने मारलेली किक क्रॉसबारवर आदळल्यामुळे बॉल रिटर्न येत असताना सेबेस्टीयन लार्सनने पुन्हा बॉल गोलपोस्टमध्ये मारला आणि स्विडनने फ्रांसविरूद्ध २-० अशी विजयी आघाडी घेतली. स्विडीश टीमच्या आक्रमक खेळापुढे फ्रान्सिसी टीम सर्वच आघाड्यांवर फ्लॉप ठरली. मात्र पॉईंट टेबलमध्ये फ्रान्सचे पॉईंट्स स्विडनपेक्षा अधिक असल्याने पराभवानंतरही फ्रान्सने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला. पराभवाच्या धक्यात असणा-या फ्रान्सिसी टीमपुढे क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य अशा युरो चॅम्पियन स्पेनचं आव्हान असणार आहे.
.