भारत-पाक क्रिकेट सीरीज लवकरच होणार

भारत विरूद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट फॅन्सना या वर्षाच्या अखेरीस क्रिकेट सीरिज पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने बीसीसीआय आणि पीसीबीनेही पावलं उचलायला सुरूवात केली.

Updated: May 30, 2012, 05:05 PM IST

www.24taas.com, चेन्नई

 

भारत विरूद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट फॅन्सना या वर्षाच्या अखेरीस क्रिकेट सीरिज पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने बीसीसीआय आणि पीसीबीनेही पावलं उचलायला सुरूवात केली. त्यामुळे सर्व काही सुरळीत झाल्यास, वर्षअखेरीस २३ डिसेंबर ते १० जानेवारी २०१३ दरम्यान भारत विरूद्ध पाकिस्तान वन-डे मॅचची सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे.

 

क्रिकेटला धर्म मानणाऱ्या फॅन्सची आशिया खंडात अजिबात कमी नाही. त्यातही भारत आणि पाकिस्तान या देशांदरम्यान होणाऱ्या क्रिकेट मॅचेस म्हणजे कट्टर क्रिकेट चाहत्यांकरता मेजवानीच. मात्र दहशतवादाच्या समस्यांमुळे दोन्ही देशांमध्ये गेली पाच वर्ष एकही क्रिकेट सीरिज खेळवली गेली नाही. पाकिस्तानने डिसेंबर २००७ मध्ये भारताचा अखेरचा दौरा केला होता. त्यानंतर भारतीय टीम जानेवारी २००९मध्ये पाकिस्तानचा दौरा करणार होती. मात्र दरम्यान २६/११ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्याचं सिद्ध झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा रद्द केला.

 

भारतात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० टूर्नामेंटदरम्यान बीसीसीआय आणि पीसीबी अधिकाऱ्यांमध्ये चेन्नई येथे मिटींग झाली. त्या मिटींगदरम्यानच २३ डिसेंबर २०१२ ते १० जानेवारी २०१३ दरम्यान भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात तीन वन-डे मॅचेस अथवा दोन वन-डे आणि एक टी-२० मॅचचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रस्ताव दोन्ही देशाच्या बोर्डाने मान्य केल्यास, पाकिस्तान आणि भारत यांच्यात तब्बल पाच वर्षांनंतर सीरिज खेळली जाईल. नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय क्रिकेट टीमच्या वेळापत्रकानूसार इंग्लंडची टीम डिसेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.