मी क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम करतो- सचिन

आपल्या क्रिकेटवरील अतोनात प्रेमामुळेच आपण दोन दशकांहून जास्त काळ क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्थानावर राहू शकलो, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. मी क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम करतो.

Updated: Jul 11, 2012, 08:18 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

आपल्या क्रिकेटवरील अतोनात प्रेमामुळेच आपण दोन दशकांहून जास्त काळ क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्थानावर राहू शकलो, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. मी क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम करतो.  इएसपीएन वाहिनीच्या 'स्पोर्ट्ससेंटर' कार्यक्रमात मुलाखत देताना सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेटबद्दल असलेल्या वेडाचा संदर्भ दिला.

 

खेळाडूंनी मानसिक तणाव, दुखापत यांसारख्या गोष्टींपासून स्वतःचा बचाव कसा करावा, असा प्रश्न सचिनला विचारला असता सचिन तेंडुलकरने उत्तर दिलं, “एक क्रिकेटर म्हणून मी या प्रश्नाचं असं उत्तर देईन की तुम्हाला क्रिकेटबद्दल अतोनात प्रेम असायला हवं. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही सज्ज होण्यापूर्वी तुम्ही मनातून सज्ज असणं आवश्यक असतं. या पायाभरणीवरच तुमच्या स्कोअरचा डोलारा उभा राहू शकतो. जेव्हा तुम्ही अधिकाधिक खेळू लागता, तेव्हा जास्त धावा कशा काढाव्या आणि अधिक विकेट्स कशा मिळवाव्यात, हे तुमच्या लक्षात येतं.”

 

याचबरोबर आपल्या कुटुंब आणि मुलांसोबत काही मौल्यवान क्षण व्यतीत करण्यासाठी आपण श्रीलंका सीरीजमध्ये सहभागी होत नसल्याचं स्पषटीकरण सचिन तेंडुलकरने दिलं. “मी बीसीसीआयला विनंती केली. सध्या शाळांच्या सुट्ट्या सुरू आहेत. माझ्या मुलांना सुट्ट्या आहेत. मी जर श्रीलंका सीरीजसाठी खेळायचं ठरवलं, तर आत्तापासूनच मला सराव सुरू करावा लागेल. त्यामुळे मी आत्ता मुलांसाठी वेळ काढण्याचा निर्णय घेतला. यानंतरपुढचे 10 महिने मी क्रिकेटमध्येच व्यस्त असल्यामुळे मुलांसाठी पुन्हा वेळ देणं मला शक्य होणार नाही.” असं सचिन तेंडुलकरने स्पष्ट केलं.