अश्लीलतेवरून तस्लिमा- पूनम पांडेत जुंपली

पूनम पांडेची स्वतः वादग्रस्त लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तस्लीमा नसरीन यांनी कडक शब्दांत निर्भत्सना केली आहे. नसरीन यांनी लिहीलं, “पूनम पांडे नग्न झाली तरी तिला समाधान लाभलेलं दिसत नाही.

Updated: Feb 22, 2012, 04:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

पूनम पांडे हिच्या ट्विटरवर चाललेल्या अश्लील प्रकारांनी बऱ्याच जणांची झोप उडाली आहे. संस्कृती रक्षकांनी कितीही तिच्याविरुद्ध आवाज उठवला, तरी पूनमला काडीमात्र फरक पडत नाही. उलट ती आणखी चर्चेत येते आणि या चर्चा ती एंजॉय करते.

 

बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुकतीच पूनम पांडेविरुद्ध टीकेची झोड उठवली. ट्विटरवर अर्वाच्य विधानं करणाऱ्या आणि आपल्या तथाकथित फॅन्ससाठी आपले अश्लील फोटो प्रकाशित करणाऱ्या पूनमने नुकताच आपला अश्लील फोटो अपलोड करुन ट्विटरवर लिहीलं होतं, “ऍटिट्यूड हा अंतर्वस्त्रांसारखा असतो. तो परिधान करायचाच असतो. पण कधीच दाखवायचा नसतो.”

 

या शब्दांत ऍटिट्यूडची व्याख्या लिहीणाऱ्या पूनम पांडेची स्वतः वादग्रस्त लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी कडक शब्दांत निर्भत्सना केली आहे. नसरीन यांनी लिहीलं, “पूनम पांडे नग्न झाली तरी तिला समाधान लाभलेलं दिसत नाही. तिला जगातली सगळ्यात अश्लील गोष्ट करावीशी वाटतेय, जी आत्तापर्यंत कुणीही केली नसेल. आता काय तिला लोकांसमोर संभोग करायचा आहे?”


स्त्रीवादी म्हणवणाऱ्या तस्लीमा नसरीन यांचं म्हणणं आहे की, त्यांचा पूनमच्या प्रसिद्धीला विरोध नसून ती स्त्रीच्या सन्मानाला जो धक्का लावत आहे, त्या गोष्टीला आहे. ट्विटरवर पूनम विरोधात प्रतिक्रिया देताना नसरीन यांनी पूनमचाच एक व्हिडिओही दाखवला आहे, ज्यात पूनम म्हणाली आहे की तिला संधी मिळाली, तर ती 'डर्टी पिक्चर'मधल्या विद्या बालनपेक्षाही जास्त 'डर्टी' बनून दाखवेल.

 

आता इतकी सडकून टीका केल्यावर गप्प बसेल तर ती पूनम पांडे कुठली! पूनमने यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. पूनमला आपल्या वागण्याचा प्रचंड अभिमान वाटत आहे. तिने ट्विटरवर लिहीलं आहे, “बहुतेक लोक आपल्यातील लैंगिक राक्षस दडवून ठेवतात. पण, आम्ही मात्र त्याला लगाम घालून त्यावर स्वार होऊन बाहेर फिरवतो.”

पूनमने तस्लीमा नसरीन यांचा उल्लेख न करता तिच्याबद्दल लिहीलं आहे. आपला आणखी एक अश्लील फोटो अपलोड करून पूनमने ट्विटरवर लिहीलं आहे, “सुसंस्कृत स्त्रिया... क्वचितच इतिहास घडवतात.” एवढं बोलूनही पूनमचं समाधान झालं नाही. तिने इतरांना सल्ला दिला आहे, “इतर लोक काय म्हणतात त्या कडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे हवंय, तेच तुम्ही करा. काही लोक तुमचा तिरस्कार करतील, पण काहींना तुम्ही पसंत पडाल. आणि हेच लोक जास्त महत्त्वाचे आहेत.”

 

पूनमने अशी मुक्ताफळं उधळल्यावर आता तस्लीमा नसरीन यावर काय बोलणार? देवच जाणे !