www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. यापूर्वीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे मन वळवले होते. त्यामुळे ते पक्षात कायम राहिले होते.
आता पुन्हा पक्षात धुसफूस झाली असून ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे नक्की असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ते नक्की शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
यापूर्वी त्यांनी गेल्या २३ मार्च २०१२ आणि २ एप्रिल २०१२ रोजी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. परंतु, त्यांचे मन वळविल्याने ते पक्षात राहिले होते.
तात्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना चांगलाच चोप दिला होता. यावेळी हर्षवर्धन जाधव गंभीर जखमी झाले होते.