बलात्काराच्या आरोपीने केली आत्महत्या

आपली अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात अतिप्रसंग करणार्‍या नराधमाची मजूर महिलेने जीभ छाटल्याची घटना १४ फेब्रुवारी २0१२ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे घडली होती.

Updated: Jan 6, 2013, 12:06 AM IST

www.24taas.com, बर्दापूर
आपली अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात अतिप्रसंग करणार्‍या नराधमाची मजूर महिलेने जीभ छाटल्याची घटना १४ फेब्रुवारी २0१२ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे घडली होती. या प्रकरणातील आरपी दादासाहेब उर्फ दादाराव विश्‍वनाथ हारे(वय २७) याने जामिनावर सुटल्यानंतर गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
जालना जिल्ह्यातील अंमलगाव परिसरातील काही मजूर रोजगाराच्या शोधात अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव परिसरात वर्षभरापूर्वी आले होते.
त्यातील एका महिलेला एकटी गाठून दादासाहेब हारे याने बलात्काराचा प्रयत्न केला होता. यावेळी महिलेने त्याचा प्रतिकार करताना दाताने त्याच्या जिभेचा लचका तोडला होता. जिभेचा तुकडा पडल्यामुळे हारेवर उपचार करण्यात आले. नंतर त्याला अटक झाली. मात्र त्यानंतर आरोपीची जामीनावर सुटका झाली.
पण सुटून आल्यानंतर त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. बर्दापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार दिलीप माने हे करत आहेत.