वर्धा जिल्हा सहकारी बँक अडचणीत

वर्धा जिल्हा सहकारी बँक अडचणीत आली आहे. बँकेतून खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळं शिक्षकांचे पगार, सेवानिवृत्तांची पेन्शन आणि शेतक-यांचे अनुदान थकलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 10, 2013, 10:40 PM IST

www.24taas.com, वर्धा
वर्धा जिल्हा सहकारी बँक अडचणीत आलीये. बँकेतून खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळं शिक्षकांचे पगार, सेवानिवृत्तांची पेन्शन आणि शेतक-यांचे अनुदान थकलंय.
शेतक-यांची बँक म्हणून स्थानिक पातळीवर ओळख असलेल्या वर्धा जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक अवस्था बिकट झालीये. बँकेत सध्या रोख रकमेचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. रिझर्व बँकेनं ठेवी घेण्यास निर्बंध घातल्यानं बँकेची ही अवस्था झाली आहे. सध्या बँकेच्या खात्यातून फक्त एक हजार रुपयेच काढता येत आहेत. याचा फटका शेतकरी, शिक्षक, पेन्शनर आणि खातेदारांना बसलाय. बँकेतून एक हजार रुपयेच मिळत असल्यानं खातेदारांची आर्थिक नाकाबंदी झाली आहे.
शेतीच्या कामांसाठी वेळेवर पैसे मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा इशारा शेतक-यांनी दिलाय. रिझर्व बँकेनं निर्बंध घातल्यानं हजारो खातेदारांचे आर्थिक व्यवहार खोळंबलेत. बँक प्रशासन या अडचणीवर कशी मात करते याकडं ठेवीदारांचे डोळे लागले आहेत.