बाळासाहेबांना न भेटण्याचा पस्तावा - शाहरुख

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर विविध स्तरांतून शोक व्यक्त होतोय. बऱ्याच काळानंतर बॉलिवूड बादशाह शाहरुख खान यानं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपलं मौन सोडलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 18, 2012, 07:52 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
शनिवारी दुपारी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालंय. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आलेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर विविध स्तरांतून शोक व्यक्त होतोय. बऱ्याच काळानंतर बॉलिवूड बादशाह शाहरुख खान यानं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपलं मौन सोडलंय.
२०१० साली आलेला ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा शाहरुख खान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात वितुष्ठ आणि मतभेद निर्माण होण्याचं कारण बनला. हा सिनेमा सिनेमागृहांत झळकावला जाऊ नये, असा चंगच यावेळी बांधला होता. शाहरुख खाननं पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याचा हा परिणाम होता. त्यानंतर आणखी एकदा हे दोघे आमने-सामने आले. यावेळचं कारण होतं वानखेडे स्टेडियमवर शाहरुखनं घातलेला धिंगाणा... मग काय, बाळासाहेबांनी शाहरुखला चांगलाच फैलावर घेतलं होतं.
पण, आता वैयक्तिक मतभेद बाजुला ठेऊन बाळासाहेबांना एकदा तरी भेट द्यायला हवी होती असं शाहरुखला वाटतंय. तो म्हणतो, ‘आम्ही आमचे वैयक्तिक मतभेद विसरायला हवे होते पण त्यासाठी आम्ही कधीच प्रयत्न केला नाही आणि आता खूप उशीर झालाय. मीही बाळासाहेबांची एकदा भेट घ्यायला हवी होती. मी आमचं संभाषण नक्कीच मिस् करेन’ असं शाहरुखनं ट्विटरवर म्हटलंय.