पोलिसांवरचा ताण वाढला; पोलीस आयुक्तांच्या मुलीचं लग्न रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद सुरू झालाय. याचाच परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही झालाय. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी रिचा हिचं रविवारी होणारं लग्न पुढे ढकललं गेलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 18, 2012, 12:23 AM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद सुरू झालाय. याचाच परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही झालाय. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी रिचा हिचं रविवारी होणारं लग्न पुढे ढकललं गेलंय.

बाळासाहेबांच्या निधनाची बातमी आली आणि मुंबईच सुन्न झाली. या तणावग्रस्त परिस्थितीचा तत्काळ परिणाम पोलिसांवर झालाय. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस जीवस ठिकठिकाणी तैनात झालेत. पोलिसांवरचा ताण स्पष्टपणे दिसून येतोय. मुंबई पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी रिचा हिचा विवाह रविवारी होणार होता. पण, सद्य परिस्थितीत सिंह यांनी हा विवाहसोहळा पुढे ढकललाय.
या विवाहसोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रणदेखील देण्यात आलं होतं. नेते, बॉलिवूड मंडळी, व्यावसायिक अशा सर्वांच्या स्वागताची तयारी झाली होती. पण, बाळासाहेबांच्या प्रकृतीत तीन दिवसांपूर्वी बाळासाहेबांची प्रकृती अस्थिर असल्याची बातमी आली आणि पोलिसांची झोप उडाली. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. कोणत्याही घटनेचा परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही नेहमीच दिसून येतो. तेच झालं आणि पोलिसांना आपल्या नियोजित कार्यक्रमांना तिलांजली द्यावी लागतेय. कर्तव्यनिष्ठ अधिकारी आपापल्या कामावर रूजू झालेत. मुंबई पोलीस आयुक्तांनीही आपल्या मुलीचं लग्न पुढे ढकलून आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलंय.