ब्लॉग: बाप नावाचा पारिजातक!

नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 22, 2014, 05:46 PM IST

www.24taas.com , अभिषेक देशपांडे, सॉफ्टवेअर इंजिनिअर, मनातले आतले!
नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती. पहिला विचार मनात आला तो बाबांना आठवण्याकरीता खरंच कुठल्या ‘फादर्स डे’ची गरज आहे का? आजच्या ह्या विज्ञान युगात म्हणे प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन असावी लागते. मग मी पण ‘बापाची’ व्याख्या शोधायला लागलो. कागदावर मनातील विचारांचे थैमान माजतांना बघून माझंच मला ‘कंट्रोल’ करणं गरजेचं ठरू लागलं. पण त्या विचारांच्या त्सुनामीनंतर एक परिपूर्ण अशी व्याख्या तयार करता आली.
“भावना व्यक्त न करू शकणारी ‘आई’ म्हणजे बाबा”... ते आजचे डॅड... जन्म देणारी जशी आई तसेच जन्म सार्थकी लागावा यासाठी आयुष्यभर झगडणारा तो बाबा... आईच्या मऊशार तळव्या मागचा तो राकट हात म्हणजे बाबा... पोरांनी कितीही आपलं घरटं सोडून नवी क्षितीजे गवसण्याचा प्रयत्न केला तरी बाप मात्र त्या घरट्याचा पाया मजबूत ठेवून मायेचं छत्र कायम ठेवत असतो. आपली अपूर्ण स्वप्न आपल्या पोरांमध्ये बघणाराययय त्यांच्या यशात आनंदी होणारा आणि खचलेल्या मनाला उभारी देणारा हात म्हणजेच बाबा... अण्णा... पप्पा... आणि डॅड... कोणत्याही निर्णायक क्षणी आश्वासक असणारं श्रद्धास्थान म्हणजे बाबा.
आई माया लावते तर बाप शिस्त लावतो, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ला आता कळतंय बाबांनी घेतलेला माझा अभ्यास आणि 29चा पाढा पाठ होत नाही म्हणून केलेली शिक्षा माझ्या ‘करिअर’च्या दृष्टीनं किती महत्त्वाची होती. रात्री उठून आपल्या मुलाच्या अंगावर चादर आहे की नाही बघतांना जणू एका सुरक्षेचा ‘औरा’च तयार करणाऱ्या बाबांची किमयाच न्यारी.. मनाने कितीही कणखर असला, तरी पण पोरगी लग्न होऊन जाते तेव्हा आतून हललेलाच असतो कारण असं म्हटल्या जातं की पोरगी ही बापाची लाडकी आणि पोरगा आईचा लाडका असतो.
शेवटी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात कोण किती मोठा आहे हे सांगण्याचा मापदंड बापच असतो. कारण एखाद्या कर्तबगार माणसाला आपण ‘बापमाणूस’च म्हणतो ना... मूल जन्माला आल्यावर पहिला शब्द ‘आई’ म्हणायला लागला की सगळ्यात जास्त आनंद त्या बापालाच होत असतो. पित्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण अंगवळणी पाडत असतो. अभ्यासाव्यतिरिक्त मैदानी आणि बुद्धीच्या खेळांमध्ये इंटरेस्ट तयार करतांना ‘खिलाडू वृत्ती’चे धडे पण बाबांकडूनच मिळाले हे सांगतांना मला अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती आणि अर्थशास्त्राचे बाळकडू पण बाबांकडून मिळाले.
त्यांच्या निर्णयाचा, विचारांचा परिघ मला कधीही छेदून गेला नाही. बऱ्याचदा शांत राहून त्यांनी आमच्यावर विश्वासच दर्शविला. मलाच काय कोणाला पण आपल्या वडिलांच्या डोळ्यात त्यांच्या स्वप्नपूर्तीची झलक बघून आनंदच होत असणार.
एक मात्र अगदी खरंय की बापा शिवाय जमत नाही.. व्हाया आई बोललं तरी, बोलल्या शिवाय राहवत नाही... आणि काही केल्या बाप नावाच्या देवाचा थांग पत्ता मात्र लागत नाही.. !
कदाचित माझ्या ‘फादर्स डे’च्या प्रश्नाचं उत्तर मला मिळायला लागलंय. प्रत्येक मुलाचा-मुलीचा रिअल हिरो त्यांचा ‘बाप’च असतो आणि आज ‘अहो बाबांचा’, ‘अरे बाबा‘ झाला असला तरी त्यांचा आदर तोच आहे आणि अशा आदरणीय पारिजातकास नमन... बाप नावाचा पारिजातक!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.