ब्लॉग : भारतीय क्रीडा जगतात 'लीग'ची रिघ

Updated: Dec 28, 2015, 07:30 PM IST
ब्लॉग : भारतीय क्रीडा जगतात 'लीग'ची रिघ title=

नरेंद्र बियानी / बदल हा अपरिहार्य आहे. कोणत्याही क्षेत्रातील बदल हा कालानुरूप होत असतो आणि त्या-त्या काळात तो आवश्यकही असतो. गेल्या काही दशकामध्ये भारतीय क्रिडा क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळालीत. देशातील खेळांचं स्वरूप बदललं. प्रमुख खेळांचंच नाही तर अगदी पारंपरिक खेळांचही स्वरूप बदललंय. खेळामुळे फक्त शारिरीक उर्जाच वाढते असे नाही तर, देशाचा मान-सन्मानही वाढत असतो. प्रेक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांचं मनोरंजन करण्याचं काम खेळाच्या माध्यमातून होत असतं. गेल्या दहा वर्षांचा विचार करता भारतात जवळपास सर्वच खेळांची लीग होताना दिसतेय. याचा अर्थ सरळ आहे. खेळांचं बाजारीकरण झालंय. खेळाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं. मोठ्या उद्योजकांसाठी या लीग म्हणजे गुंतवणुकीचं मोठ साधन बनत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींनी यात संघ विकत घेतल्यामुळे या लीगला ग्लॅमर आलं. लीगमुळे खेळांचे उद्दिष्ट बदललं. खेळाडुंचा चक्क लिलाव होऊ लागला. खेळाला देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देणं, हा या 'लीग'प्रयोगाचा प्रमुख उद्देश. क्रिकेट-फुटबॉल यांसारख्या खेळांनी मुळातच एक उंची गाठली आहे. पण कुस्ती, कबड्डी यासारखे देशातील पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देण्याचं काम लीगच्या माध्यामातून करणं अपेक्षित आहे. अशा खेळांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांची लीग होणं गरजेचंच होत. कारण सध्या खेळांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय त्यांची प्रतिष्ठा वाढत नाही, हे समीकरण बनलं आहे.

1996 साली राष्ट्रीय फुटबॉल लीगची स्थापना झाली. परंतु अनेक सीजन्स होऊनही हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने या लीगची पुनर्रचना करत 2007 साली आय-लीगची निर्मिती केली. पण ख-या अर्थाने लीग होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली ती क्रिकेट या लोकप्रिय खेळाने. 2007 मध्ये 'आयसीएल' म्हणजेच इंडियन क्रिकेट लीगची निर्मिती झाली. झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसचं अर्थसहाय्य असलेल्या 'आयसीएल'ने क्रिकेटचा फॉरमॅटच बदलला. 50 षटकांचा दिवसभर प्रेक्षकांच मनोरंजन करणारा हा गेम अगदी 20 षटकांत क्रिकेटप्रेमींमध्ये थरार निर्माण करायला लागला. यातूनच टी-20 ची संकल्पना समोर आली. परिणामी हा खेळ खेळाडुंच्या आणि तज्ज्ञांच्या हातून अलगद मार्केटींग आणि व्यावसायिकांच्या हाती गेला. खेळांडूंना विकत घेण्याची संकल्पना समोर आली आणि त्यांच्यावर बोली लागायलाही सुरूवात झाली.

टेरिटरी कॉन्शस असलेले हे खेळं आणि खेळाडूंच मात्र कन्व्हर्जंन्स झालं. देश-प्रदेश यांच्यापलिकडे जाऊन खेळ आणि खेळाडुंच्या एककेंद्राभिमुखतेला प्राधान्य दिलं गेलं. म्हणजे कोणत्याही देशातल्या खेळाडूवर बोली लावली जाते. बोली लावणारा संघाचा मालक खेळाडुला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतो. खेळाचे नियम आणि तत्व बदलले. फिक्सिंग-बेटींग सारख्या समस्या डोकं वर काढू लागल्या. या समस्या आधी नव्हत्या असं नाही. खेळांच्या व्यावसायिकतेमुळे त्यात वाढ झाल्याचंच दिसून येतंय. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. खेळाडुंसाठी याची दुसरी बाजुही महत्वाची होती. ती म्हणजे, त्यांच्या प्रतिभेला मिळणारी संधी. लीगमुळे नवनविन खेळाडुंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं. त्यांच्या अर्थार्जनात वाढ होऊ लागली. नविन खेळाडुंनीही संधीचं सोनं करत स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा वाढविली.

मैदानी खेळांची जागा आता मॅटने घेतली. मैदानी खेळ म्हणून लोकप्रिय असलेला कबड्डी हा खेळ आता प्रो कबड्डी म्हणून मॅटवर अवतरलाय. हे कमी की काय! अगदी कुस्ती या खेळालाही या लीगने (व्यावसायिकांनी) धोबी पछाड करत कुस्तीचीही लीग तयार केलीय. भारतात जवळपास सर्वच खेळांची लीग होतांना दिसतेय. जणू भारतात लीगची रिघच लागलीय. या लीगने भारतात सर्वच खेळांवर बाजी मारली आहे. अशाच

भारतीय खेळांवर वर्चस्व गाजवणा-या भारतीय स्पोर्टस लीगची ही थोडक्यात माहिती :

Indian Cricket League (ICL)

2007 मध्ये आयसीएल या खाजगी लीगच्या पहिल्या सीजनला सुरूवात झाली आणि 2009 मध्ये बीसीसीआयने सिक्सर मारत या लीगला 2009 मध्ये आपला गाशा गुंढाळायला लावला. एस्सेल ग्रुपची संकल्पना आणि अर्थसहाय्य असलेल्या आयसीएलला बीसीसीआयने सुरूवातीला आयसीएलच्या खेळाडूंना आम्ही प्रोत्साहन देऊ आणि त्यांना भारतीय संघामध्ये समाविष्ट करू अशाप्रकारचे समर्थन दिले. पण आयसीएलचं वर्चस्व आणि प्रसिद्धी वाढतेय हे लक्षात येताच बीसीसीआयने आयसीएलच्या खेळाडूंवर बंदी लावायला सुरूवात केली. अगदी आयसीएलसाठी जाहिरात बनविणा-या एजन्सीवरही आजीवन बंदी घातली. आयसीसीनेही (आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आयसीएलला मान्यता दिली नाही. नंतर बीसीसीआयने आपली वेगळी चूल मांडली आणि आयपीएल अस्तित्वात आली.

स्थापना : 2007 (2009 मध्ये बंद)

संघ : 09  (मुंबई चाम्पस्, चेन्नई सुपरस्टार्स, चंदीगड लायन्स, हैदराबाद हिरोज, रॉयल बंगाल टायगर्स, दिल्ली जायंट्स, अहमदाबाद रॉकेट्स, लाहोर बादशहाज, ढाका वॉरियर्स)

Indian Premiere League (IPL)

जगात सर्वात जास्त पाहिली जाणारी स्पोर्टस लीग म्हणजे आयपीएल. 2008 साली आयसीएलला क्लीन बोल्ड करत बीसीसीआयने आयपीएलला बॅटींग करायला क्रिकेट विश्वाच्या मैदानात उतरवलं. आयसीएलची कॉपी करत आयपीएलमध्येही टी-20 चाच फॉर्म्याट कायम ठेवण्यात आला. या लीगमुळे मात्र क्रिकेटचा चेहराच बदलला. आयपीएल हे शरद पवारांचंच ब्रेन चाईल्ड असल्याचं सर्वत्र मानलं जातं. कारण 2005-2008 या कालावधीत शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यामुळे आयसीएलची वाट लावून आयपीएलला वाट मोकळी करून देण्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा असल्याचे समजते. इंडियन प्रिमीयर लीग ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच स्थापन केली असल्यामुळे या लीगला सर्वत्र मान्यता मिळाली. या लीगला प्रसिद्धीही खुप मिळाली आणि त्याच प्रमाणात आयोजक आणि खेळाडूंवर भ्रष्टाचार, स्पॉट-फिक्सिंग आणि गैरव्यवहार यांसारखे आरोपही लागले. यात काही संघ बाद करण्यात आलेत तर काही संघ फिंक्सिंगच्या आरोपांमुळे दोन वर्षांकरीता निलंबितही करण्यात आले आहेत.   
स्थापना : 2008 
संघ : 13 
(दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद)
भावी संघ : पुणे आयपीएल संघ, राजकोट आयपीएल संघ
निलंबित संघ : चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स 
रद्द संघ : कोची टस्कर्स केरळ, पुणे वॉरियर्स इंडिया, डेक्कन चार्जर्स

I-League

ही देशातील प्रमुख व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. क्रिकेटच्या लोकप्रियतेला टक्कर आणि फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी 1996 साली राष्ट्रीय फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. परंतु प्रेक्षकांनी सगल 11 हंगाम या लीगकडे पाठ फिरवली. त्यामुळे या लीगच्या पुनर्रचनेचा विचार करत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 2007 मध्ये आय-लीगला सुरूवात केली. आय-लीगमुळे पुढे भारतीय फुटबॉलला ख-या अर्थानं व्यावसायिक स्वरुप प्राप्त झालं. आय-लीगच्या 2007 च्या हंगामात 8 क्लबने सहभाग घेतला होता. 2015 च्या हंगामात सहभागी क्लबची संख्या 11 आहे. सध्या आय-लीग आणि आयएसएल (इंडियन सुपर लीग) यांच्या विलिनीकरणाचा वाद सुरू आहे. गेली अनेक हंगाम आय-लीगला प्रेकक्षांनी किक मारली आहे. आय-लीगचे सामने रिकाम्या स्टेडियमवरही होतात, अस वक्तव्य माजी कर्णधार बायचुंग भुतीया याने केले होते. यातच प्रतिस्पर्धी लीग आयएसएल आल्यामुळे आय-लीगला उतरती कळा लागली आहे. सेकंड डिव्हीजन लीग, यू-18 आय-लीग आणि यू-15 यूथ लीग या तीनही लीगचा आय-लीग अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. आय-लीग ही प्रमुख फुटबॉल लीग असली तरी खेळाच्या व्यावसायिकतेच्या मानाने फुटबॉलला मात्र प्रसिद्धी मिळवून देण्यात ही लीग अपयशी ठरली आहे. 
स्थापना : 2007
क्लब : 11 (ईस्ट बंगाल एफ.सी., भारत एफ.सी., डेम्पो एस.सी., मोहन बागान ए.सी., मुंबई एफ.सी., पुणे एफ.सी., रॉयल वाहिंगडोह एफ.सी., साळगावकर एफ.सी., शिलाँग लाजोंग एफ.सी., स्पोर्टिंग क्लब दे गोवा) 

Indian Super League (ISL)

आयएसएल ही भारतातील उच्च स्तरीय फुटबॉल लीग आहे. आय-लीगची ही प्रमुख प्रतिस्पर्धी लीग. आय-लीगच्या तुलनेत या लीगला प्रचंड प्रतिसाद आणि प्रसिद्धीही मिळाली. 2010 सालापासून या लीगच्या निर्मितीची प्रक्रिया जरी सुरू होती, तरी 21 ऑक्टोबर 2013 मध्ये ही लीग अस्तित्वात आली. या लीगसाठी फक्त बॉलीवूड सेलिब्रिटीच नाहीत तर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारख्या सुप्रसिद्ध क्रिकेटर्सनीही संघ विकत घेतले. या लीगच्या प्रसिद्धीच हेच मुळं कारण आहे. हिरो कंपनी या लीगची प्रमुख प्रायोजक असल्यामुळे या लीगला हिरो इंडियन सुपर लीग असेही म्हणतात. 
स्थापना : 2013
संघ : 8 (अलेटीको डी कोलकाता, चेन्नईन, दिल्ली डायनामोज, गोवा, केरळ ब्लास्टर्स, मुंबई शहर, ईशान्य युनायटेड, पुणे शहर)

Hockey India League (HIL)

आयपीएलच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी संलग्न हॉकी इंडिया लीगची स्थापना करण्यात आली. हॉकी इंडिया या प्रशासकीय समितीमार्फत या लीगचा कारभार चालतो. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मदतीने, या लीगच्या माध्यमातून, भारतीय हॉकीचा विकास आणि प्रसार करण्यासाठी एक सुनियोजित दीर्घकालीन विकास कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हॉकी इंडिया लीगची 2013 साली स्थापना करण्यात आली. पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या लीगचा चवथा हंगाम होणार आहे. या सामन्यांमध्ये 6 संघ खेळणार आहेत.   

स्थापना : 2013
संघ : 06 (दिल्ली वेवरायडर्स, कलिंगा लांसर्स, दबंग मुंबई, पंजाब वॉरियर्स, रांची रेज, उत्तर प्रदेश विझार्ड्स)

Pro Kabaddi League 

प्रो कबड्डी लीग ही पारंपरिक कबड्डीचा आधुनिक चेहरा आहे. मशाल स्पोर्टसच्या पुढाकारतून 2014 मध्ये या लीगची स्थापना करण्यात आली. ही लीग ख-या अर्थाने एक व्यावसायिक कबड्डी लीग आहे. ही लीग म्हणजे देश-विदेशात कबड्डीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक महत्वाचा टप्पा मानला जातो. सध्या ही स्पर्धा बघणा-या दर्शकांची संख्या 435 दशलक्ष एवढी आहे. त्यामुळे प्रो कबड्डी ही जगात सर्वात जास्त पाहिली जाणारी आयपीएलनंतर दुस-या क्रमांकाची लीग आहे.  
स्थापना : 2014
संघ : 08 (बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली, जयपूर गुलाबी पँथर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटण, तेलगू टायटन्स, यू मुम्बा)

बॅडमिंटन, गोल्फ, व्हॉलीबॉल, मार्शल आर्ट्स, रेसिंग, कुस्ती अशा बहुतेक सर्वच खेळांची लीग तयार झाली आहे. भारतीय अॅथलेटिक्स लीग ही प्रस्तावित लीग असून, भारतात अशा अनेक खेळांची लीग होण्यासाठी रिघ लागलीय.