www.24taas.com, मुंबई
राजेश खन्ना आणि अनिता अडवानी हे दोघे एकमेकांशी विवाह करण्यास पात्र नसल्याने त्यांच्यातील लीव्ह इन रिलेशनशिप वैध ठरत नाही.
तसेच राजेश खन्ना यांच्या लीव्ह इन रिलेशनशिपची जबाबदारी कायद्याने त्यांच्या कुटुंबीयांवर येत नाही, असा दावा डिंपल कपाडिया यांनी हायकोर्टात केला. त्यामुळे आशीर्वाद बंगल्यासाठी तसेच पोटगीसाठी अडवानी यांनी खन्ना कुटुंबियांवर भरलेल्या खटल्याच्या सुनावणीस हायकोर्टाने स्थगिती दिली.
आपण खन्ना यांच्यासोबत गेली अनेक वर्षे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होतो; मात्र खन्ना यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी डिंपल, जावई अक्षय कुमार आदींनी आपल्याला आशीर्वाद बंगल्याबाहेर काढले, असा अडवानी यांचा दावा आहे. त्यामुळे अडवानी हिने खन्ना कुटुंबीयांविरुद्ध वांद्रे येथील मेट्रो मॅजिस्ट्रेट यांच्याकडे खटला दाखल केला आहे. त्याविरुद्ध डिंपल, अक्षय तसेच खन्ना यांच्या मुली ट्विंकल व रिना यांनी सादर केलेल्या याचिकांची सुनावणी काल न्या. यू. डी. चांदीवाल यांच्यासमोर झाली. त्यावेळी त्यांनी या खटल्यास स्थगिती देऊन अडवानी यांना नोटीस बजावली.
अडवानी यांनी भरलेला हा खटला निरर्थक आहे, मुख्य म्हणजे लीव्ह इन रिलेशनशिप संदर्भातील पतीची जबाबदारी त्याच्या नातलगांवर पडत नाही. त्याचप्रमाणे खन्ना आणि अडवानी यांच्यातील लीव्ह इन रिलेशनशिप वैध नाही, असे खन्ना कुटुंबीयांतर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते व महेश जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देऊन सांगितले.
मुळात असे रिलेशन असण्यासाठी संबंधित दोनही व्यक्ती एकमेकांशी विवाह करण्यास कायद्याने पात्र असले पाहिजेत. खन्ना यांचा विवाह डिंपल कपाडिया यांच्याशी झाल्यावर त्यांच्यात घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे राजेश खन्ना दुसरा विवाह करू शकत नव्हते. तसेच अनिता अडवानी यांचाही रॉड्रिग्ज यांच्याशी विवाह झाला होता. त्यांनी एसआरएच्या घरासाठी छायाचित्रासह केलेल्या अर्जात आपले नाव अनिता रॉड्रिग्ज असे लिहिले आहे, असे आम्हाला माहितीच्या अधिकारानुसार कळल्याचे डिंपल यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.