फिल्म रिव्ह्यू: `फगली` – समाजाबाबत फिलिंग अग्ली!

सरकारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारा ‘रंग दे बसंती’ आपण पाहिलेलाच आहे. त्याच धर्तीवर समाज व्यवस्थेविरोधात लढणारा चित्रपट म्हणजे ‘फगली’ रिलीज झालाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 14, 2014, 03:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सरकारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारा ‘रंग दे बसंती’ आपण पाहिलेलाच आहे. त्याच धर्तीवर समाज व्यवस्थेविरोधात लढणारा चित्रपट म्हणजे ‘फगली’ रिलीज झालाय. देश बदलायला पाहिजे, व्यवस्था बदलायला पाहिजे अशा आत्मविश्वासानं लढणारी आजची पिढी आणि या बदलासाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्याची त्यांची असणारी तयारी हा धागा पकडून गेल्या काही वर्षांमध्ये काही हिंदी चित्रपटांची निर्मिती झालीय. त्यातलाच ‘फगली’ हा एक...
चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचं आपल्याला जाणवतं. मात्र, प्रत्यक्षात `फगली` पूर्णपणे सीरियस वाटेवरून जातो.
पटकथा
देव (मोहित मरवाह), गौरव (विजेंदर सिंग), आदित्य (अरिफ लांबा) आणि देवी (किआरा अडवानी) हे चार मित्र-मैत्रिणी चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यांमध्ये नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटसमोर जाऊन देव स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर देवला हॉस्पिटलमध्ये अॅड‌मिट केलं जातं आणि चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो.
एका दुकानदाराकडून देवीची छेडछाड झाल्यानंतर त्याला धडा शिकविण्यासाठी देव, गौरव, आदित्य, देवी हे चार जण या दुकानदाराला किडनॅप करतात. मात्र, त्यांचा हा डाव पोलीस इन्स्पेक्टर चौटाला (जिम्मी शेरगिल) पूर्णपणे उलटवतो.
गौरवचे वडील राजकारणी असल्यामुळं या प्रकरणात आपण सहज सुटू असा अंदाज चौघं बांधतात. मात्र, प्रत्यक्षात किडनॅप केलेल्या दुकानदाराचा खून करून, चौटाला या चौघांवर आळ घेतो. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी चौटाला साठ लाख रुपयांची मागणी चौघांकडे करतो.
तारुण्यात असणारी स्वप्नं, आकांक्षा बाजूला सारून या चौघांनाही केवळ पैशासाठी गुन्हेगारीकडे वळावं लागतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये चौटालाला धडा शिकविण्यासाठी चौघं अनेक डाव आखतात. मात्र ते त्यांच्यावरच कसे उलटतात, पुढं हे चौघं काय करतात. या कथानकात पुढे काय होतं? चौटालापासून चौघांची सुटका होते का? राजकारणी असलेल्या गौरवच्या बापाची यामध्ये काय भूमिका आहे? चौटालाविरोधात लढण्यासाठी देवला स्वतःला पेटवून का घ्यावं लागतं? या प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी `फगली` पाहायला हवा.
का पाहावा?
चित्रपटाचा एकूण बाज आणि त्यातील लढा हा थेट आजच्या प्रश्नांशी निगडीत आहे. त्यामध्ये एक प्रकारचे थ्रील आहे, उत्सुकता आहे, पुढे काय होईल याबाबत तर्क-वितर्क आहेत. मात्र, मध्यंतरानंतर कथेतील तणाव हाताळताना चित्रपट कमालीचा संथ बनला आहे. मध्यंतरापर्यंत एका विशिष्ट वेगानं चित्रपट पुढे जातो.
जिम्मी शेरगिलनं रंगविलेला व्हिलनही नक्कीच खास आहे.
चार मित्रांपैकी एक असलेला बॉक्सर विजेंदर सिंग अॅक्टिंगमध्ये कमी पडतोय. चौघांचे काही विनोदी प्रसंग कथानकातील तणाव कमी करण्याचं काम करतात. एकूण काय तर `फगली`चं कथानक आणि त्यात मांडलेला विचार नक्कीच वेगळा आहे. एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.