www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींवर बीसीसीआय आजन्म बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकते. येत्या २५ सप्टेंबरला चेन्नई इथं बोलवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निर्णय होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ज्योतिरादित्य सिंधिया आणि अरुण जेटली यांच्या अनुशासन समितीद्वारं तयार करण्यात आलेल्या रिपोर्टवर १ सप्टेंबरला कोलकाता इथं झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
समितीच्या रिपोर्टमध्ये ललित मोदींवर आजन्म बंदी घालण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. मोदींच्या भवितव्यावर निर्णय घेण्यासाठी २५ सप्टेंबरला चेन्नईतल्या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त काढण्यात आलाय.
मोदींवर आजन्म बंदी घालण्यासाठी बीसीसीआयचं दोन-तृतियांश बहूमत आवश्यक असेल. म्हणजे कमीतकमी २१ सदस्यांनी बंदीच्याबाजूनं मतदान करावं लागेल. जर ११ सप्टेंबरला हायकोर्टच्या सुनावणीत एन. श्रीनिवासन यांच्या बाजूनं निर्णय लागला, तर या बैठकीचं अध्यक्षपद ते भूषवतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.