www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय फलंदाज विराट कोहली जागतिक क्रिकेटमध्ये इतर क्रिकेटपटूंपेक्षा जास्त रेकॉर्डवर आपले नाव कोरु शकतो, असे माजी कर्णधार कपिल देवनं म्हटलंय. तो असेच खेळत राहिला तर सचिन तेंडुलकरचे विक्रम सहज मोडीत काढील, अशी भविष्यवाणी कपिलने व्यक्त केली आहे.
कोहलीला जर शारिरीक दुखापत झाली नाही तर मात्र दिल्लीच्या या फलंदाजाच्या कारकीर्दीचा आलेख सचिन तेंडुलकरपेक्षा नक्कीच उंचावेल. कोहली इतर खेळाडूपेक्षा जास्त रेकॉर्ड बनवले यात काही शंका नाही. मी सचिन आणि कोहलीची तुलना करत नाही, असे कपिल सांगायला विसरला नाही.
ज्याप्रमाणे दुसरा डॉन ब्रॅडमन होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे दुसरा सचिन तेंडुलकरही होणे शक्य नाही. मात्र कोहलीमध्ये विशेष कौशल्य आहे. त्यामुळे २४ वर्षीय कोहली त्यांच्या दमदार खेळाने कदाचित तेंडुलकरपेक्षा चांगले रेकॉर्ड करु शकतो. पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा चांगले असणे आवश्यक आहे, असेही कपिल म्हणाला.
कोहलीने जर ३२ ते ३४ वर्षांपर्यंत असाच फिटनेस ठेवला आणि त्याला शारिरीक दुखापत झाली नाही. तर त्याचे असे रेकॉर्ड बनतील जे आजपर्यंत व्हिवियन रिचर्ड्स आणि सचिन तेंडुलकर यांचेही रेकॉर्ड बनले नाहीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.