अभिनव कॉलेज होणार बंद

पुण्यातलं अभिनव कला महाविद्यालय बंद होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. सध्या सुट्टी सुरू असली तरी विद्यार्थी कॉलेजमध्ये जमतात.

Updated: May 15, 2012, 11:53 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यातलं अभिनव कला महाविद्यालय बंद होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. सध्या सुट्टी सुरू असली तरी विद्यार्थी कॉलेजमध्ये जमतात. त्यांच्या घरी पाठवण्यात आलेल्या एका पत्रामुळे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चित्रकला, शिल्पकला या अभिजात कलांचं शिक्षण देणारं कॉलेज म्हणून अभिनव कॉलेज प्रसिद्ध आहे.

 

या कॉलेजच्या टिळक रोड आणि पाषाण रोडला दोन शाखा आहेत. त्यापैकी पाषाणमधलं कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे अडीचशे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. ही संस्था सध्या आर्थिक अडचणीत असल्यानं कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करुनही कॉलेजला रक्कम मिळाली नाही, त्यामुळेच कॉलेज बंद करण्याची वेळ आल्याचं संस्थाचालकांनी म्हंटलं आहे.

 

या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान पुढच्या काही काळात टिळक रोडवरची शाखाही बंद करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं  नुकसान तर होणारच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अभिनव कलांचं एक प्रसिद्ध मंदिर कायमचं बंद होणार आहे.