www.24taas.com, नवी दिल्ली
आज लोकसभेत रेल्वे बजेट सादर करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी हे आज बजेट सादर करतील. त्रिवेदी यांचं हे पहिलंच रेल्वे बजेट असणार आहे. नेहमीप्रमाणे या बजेटकडून मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सेकंड क्लासचा प्रवास महाग न होण्याची परंपरा यंदाही कायम राहणार का याबाबतही उत्सुकता आहे.
मुंबईची लाइफलाईन असणाऱ्या लोकलबाबत रेल्वेमंत्री काय निर्णय घेतात यावर विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतली वाढती गर्दी पाहता लोकलच्या फेऱ्या वाढवणे, विरार-डहाणू लोकल तात्काळ सुरू करणे, आणि हार्बर मार्गावर जलद लोकल सुरु करण्याची मागणी मुंबईकरांकडून होते आहे.
मुंबईसह पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातल्या नागरिकांसाठी कोणत्या नव्या घोषणा रेल्वेमंत्री करतात याचीही उत्सुकता आहे. या भागातल्या रेल्वेप्रवाशांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होतात की नेहमीप्रमाणे त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात यावर साऱ्यांच्या नजरा आहेत.