बॉम्बे टॉकिज : नातं प्रेक्षक आणि चित्रपटाचं...

‘अक्कड बक्कड बम्बे बो अस्सी नब्बे पुरे सौ... सौ बरस का हुआ ये खिलाडी ना बुढा हुआ...’ या ओळीतला खिलाडी दुसरा तिसरा कुणीही नसून आपला भारतीय सिनेमा आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 4, 2013, 03:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘अक्कड बक्कड बम्बे बो अस्सी नब्बे पुरे सौ... सौ बरस का हुआ ये खिलाडी ना बुढा हुआ...’ या ओळीतला खिलाडी दुसरा तिसरा कुणीही नसून आपला भारतीय सिनेमा आहे. भारतात १९१३ साली पहिल्या वहिल्या सिनेमाची निर्मिती झाली होती. या जगताशी घट्ट नाळ जोडल्या निर्मात्यांनी १०० वर्षांच्या या सृष्टीला आपल्या अनोख्या पद्धतीनं आदरांजली व्यक्त केलीय.
हीच आदरांजली म्हणजे ‘बॉम्बे टॉकीज’... करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप यांनी एकत्र येऊन वाहिलेली... प्रेक्षकांना या नव्या प्रयोगाकडून खूप अपेक्षा होत्या. यापूर्वी कधीही पाहायला मिळणार अशी एक नकळत अपेक्षा या सिनेमाकडून व्यक्त करण्यात येत होती. प्रेक्षकांच्या या अपेक्षांना छेद देत हा सिनेमा वेगवेगळ्या चार कथा एकत्रितपणे मांडताना दिसतो...

करण जोहर
करण जोहरनं यात एका ‘गे’ मुलाची कहाणी कथन केलीय. साकिब सलीमनं ही व्यक्तिरेखा साकारलीय. साकिबच्या एन्ट्रीपासून हा सिनेमा सुरू होतो. आपल्या वेगळ्या विचारसरणीमुळे हा मुलगा आपल्या कुटुंबापासून दुरावतो आणि आपलं जग शोधण्यासाठी तो घराबाहेर पडतो. एका मीडिया हाऊसमध्ये वरिष्ठ असलेल्या रानी मुखर्जीच्या हाताखाली आपली पुढची वाटचाल तो सुरू करतो. राणी ही एका राजकीय विश्लेषकाबरोबर (रणदीप हुडा) आपलं वैवाहिक जीवन (थोड्या निराशेनंच) व्यतीत करतेय. नातेसंबंधातील क्लिष्टता (आणि तीही अशा ज्याला समाजमान्यता नाही) करणनं या सिनेमात मोठ्या खुबीनं चित्रीत केलीय.
जुन्या सिनेमांतील गाणी ‘अजिब दास्ताँ है ये...’ आणि ‘लग जा गले...’ या गाण्यांचा वापर मोठ्या खुबीनं करण्यात आलाय. एखादं गाणं आणि प्रेक्षक यांच्यामधलं नातं या गाण्यांतून एका वेगळ्या पद्धतीनं समोर येतं. सिनेमातील या भागातील संवाद अतिशय स्वाभाविक, सहजगत्या व्यक्त होतात.
दिबाकर मुखर्जी
एखाद्या अभिनेत्याकडून प्रेरणा घेणाऱ्या तरुणामध्ये ‘अॅक्टींग का किडा’ काय करू शकतो हे दाखवण्याचा हा आणखी एक प्रयत्न. नवाझुद्दीन सिद्दीकीनं यात आपणही अभिनयची शानदार झलक दाखवून दिलीय. एक बॉलिवूड स्टार म्हणून काही दिवसांमध्ये नवाझुद्दीनंच नाव घेतलं गेलं तर आपल्यालाही आश्चर्य वाटायला नको.
एक ‘नापास’ अभिनेता पण एक ‘बॉर्न बिझनेसमन’ असलेला नवाझुद्दीन नोकरीच्या शोधात भटकतोय. त्याची पत्नी, मुलगी आणि त्याचे पाळीव ‘एमू’ आणि शेजाऱ्यांचा स्नेह एव्हढचं नवाझुद्दीनसाठी सगळं काही आहे. त्याचा उद्देश एकच आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवणं. या सिनेमात दिबाकर आणि नवाझुद्दीन यांची केमिस्ट्री चांगलीच जमलीय. एका व्यक्तीच्या नसानसांत भिनलेली कलात्मकता आणि व्यावहारिकता यांच्यातील वितुष्ट या भागात उत्कृष्ट पद्धतीनं सादर करण्यात आलंय.
झोया अख्तर
झोया अख्तर हिनं दिग्दर्शिक केलेला सिनेमातील भाग प्रकाश टाकतो ते तुमच्या स्वप्नांवर आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण्यासाठीच्या प्रयत्नांवर... रणवीर शौरी यानं मुलीच्या आणि मुलाच्या – विकीच्या - (निमान जैन) कठोर बापाची भूमिका निभावलीय. आपल्या मुलांबद्दल चिंतीत असणारा परंतू शिस्तप्रिय असा हा बाप. आपल्या मुलानं मुलासाठी म्हणून असणाऱ्या विविध अॅक्टीव्हिटीजमध्ये सहभाग घ्यावा अशी त्याची इच्छा.... पण, विकिला मात्र बनायचंय एक डान्सर... नर्तक. आणि यासाठी त्याला प्रोत्साहन मिळालंय ते टिव्हीवर शीला की जवानीच्या तालावर नाचणाऱ्या कतरिना कैफकडून...
झोयानं दिग्दर्शकाच्या रुपात अतिशय उत्कृष्ट काम केलेलं जाणवतं. स्वप्नातील जग आणि खरंखुरं जग यातील अंतर स्पष्ट करणं तिला चांगलंच जमलंय. विकीच्या भूमिकेत ‘नमान’ या बालकलाकारनं अतिशय समजूतदारपणे काम केलंय.
अनुराग कश्यप
एक ‘डायहार्ट फॅन’ काय असतो हे तुम्हाला या सिनेमातील चौथ्या भागात विजय (विनित कुमार)च्या रुपात पाहायला मिळेल. बॉलिवूडच्या बी बीनं अमिताभनं आपल्या आईनं बनविलेला मुरंबा एकदा चाखावा म्हणून हा विजय मैलोनमैल प्रवास करून मुंबईत दाखल झालाय. अमिताभनं हा मुरंबा थोडातरी चाखावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा... हीच इच्छा पूर्ण करतोय विजय. कारण त्याच्या वडिलांनीही त्यांच्या वडिलांची इच्छा पूर्ण करत दिलीपकुमार यांना मुरंबा चाखायला लावलाय.
खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित कथेवर सिनेमा बनवणं ही अनुरागची खासियत आणि तो या प्रयोगात पुन्हा एकदा यशस्वी झालाय. विनितही उत्कृष्ट अभिनय सादर केलाय.