समुद्र खवळणार... बाप्पा विसर्जन कसं होणार?

मुंबापुरीत दहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती असून पावणेदोन लाख घरगुती गणपती असणार आहेत. या गणपतींचे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन होते.

Updated: Sep 13, 2012, 02:54 PM IST

www.24taasa.com, मुंबई
बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे आता बाप्पा कधी येतायेत याकडेच साऱय़ांचे लक्ष लागले आहेत. मुंबईकरांनी मोठ्या दणक्यात तयारी सुरू केली असली तरी विसर्जनावेळी मात्र मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. २०, २९ आणि ३० सप्टेंबर या दिवशी समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून पालिकेने गणेशभक्तांना आधीच सावध केले आहे.
मुंबापुरीत दहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती असून पावणेदोन लाख घरगुती गणपती असणार आहेत. या गणपतींचे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. मात्र दुसर्‍या आणि अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जनादरम्यान समुद्रात भरतीच्या वेळी मोठ्या लाटा उसळणार आहेत.
त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गणेशभक्तांनी भरतीच्या वेळी खोल पाण्यात जाऊन मूर्तीचे विसर्जन न करता ओहोटी असतानाच विसर्जन करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
भरतीची वेळ लाटांची उंची
(मीटरमध्ये)
२० सप्टेंबर रात्री २.४३ वाजता ४.५०
दुपारी १४.४३ वाजता ४.१८
२९ सप्टेंबर सकाळी ११.३८ वाजता ४.१९
३० सप्टेंबर पहाटे एकच्या सुमारास ४.२३
दुपारी १२.११ वाजता ४.१६