www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशमधून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी आणि नगमा यांना अतिरिर्क सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
काँग्रेसच्या तिकिटावर मेरठमधून निवडणूक लढणाऱ्या अभिनेत्री नगमासोबत गेल्या काही दिवसांत रस्त्यावर छेडछाड झाल्याचं समोर आलंय. तसंच मथुरामधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या हेमा मालिनीलाही अनियंत्रित गर्दीचा आणि टोळक्यांचा सामना करावा लागला. हे टोळके उगाचच या दोन्ही अभिनेत्रींशी लगट करण्याचा प्रयत्न करतात, असंही समोर आलंय.
त्यामुळेच, नगमा आणि हेमा मालिनी यांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. या दोघींशिवाय झांसी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलेल्या भाजपच्या नेत्या उमा भारती यांचीदेखील सुरक्षा वाढविण्यात येणार आहे.
याशिवाय, मुरादाबादहून काँग्रेसच्या उमेदवार बेगम नूर बानो यांनाही अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आलेत. मुख्य निर्वचान अधिकारी उमेश सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला उमेदवार आणि सिनेस्टार उमेदवारांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोबतच रॅलीमध्ये उपद्रव देणाऱ्या असमाजिक तत्त्वांविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.