www.zee24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. मावळात लक्ष्मण जगताप नावाचे तीन तर श्रीरंग बारणे नावाचे दोन उमेदवार अर्ज दाखल झाल्यानं शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप आणि महायुतीचे श्रीरंग बारणे यांची डोकेदुखी वाढलीय.
मावळ लोकसभा मतदार संघातल्या सर्वच उमेदवारांना खासदारकीच्या खूर्चीवर विराजमान होईपर्यंत अनेक खडतर आव्हानं पार करावी लागणारेत. अर्ज सादर झाल्यानंतर शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या समोर एक वेगळंच आव्हान उभं ठाकलंय. ते म्हणजे त्यांच्यासारखंच नाव आणि आडनाव असलेले उमेदवार त्यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उभे असणारेत.
मावळमध्येच शेकाप आघाडीकडून लक्ष्मण पांडुरंग जगताप निवडणूक लढवतायेत. तर त्याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून लक्ष्मण मुरलीधर जगतापही रिंगणात आहेत आणि आणखी एक अपक्ष म्हणून लक्ष्मण सीताराम जगताप यांनीही अर्ज भरलाय. त्यामुळं मावळमधून तब्बल तीन लक्ष्मण जगताप रिंगणात आहेत. नावांची ही गंमत इथेच संपत नाही, तर जगताप यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांच्यासमोरही अशीच डोकेदुखी आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग चंदू बारणे निवडणूक लढवत असतानाच त्याच मतदार संघात श्रीरंग चिमाजी बारणे हे जनता दलाकडून रिंगणात उतरलेत.
लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्या नावांमध्ये फक्त वडिलांची नावं वेगळी आहेत. मतांचं विभाजन करण्यासाठी करण्यात आलेली ही खेळी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे मतदार नक्की कुठल्या श्रीरंग बारणेंना किंवा कुठल्या लक्ष्मण जगतापांना निवडून देणार, याची उत्सुकता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.