'काँग्रेस हा गेंड्याच्या कातडीचा पक्ष'

अतुल भातखळकर काँग्रेस या पक्षाने देशाचे कधीच भलं तर केलं नाहीच पण तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देखील सोयीस्कररित्या बाजूला केलं. गेंड्याची कातडी असलेला आणि ज्याच्यामुळे देशाला किड लागली आहे असा हा पक्ष आहे. काँग्रेसने सत्तेत अडसर ठरणाऱ्यांना पध्दतशीरपणे दूर सारलं.

Updated: Oct 26, 2011, 12:03 PM IST

अतुल भातखळकर, भाजपा 

 

काँग्रेस या पक्षाने देशाचे कधीच भलं तर केलं नाहीच पण तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देखील सोयीस्कररित्या बाजूला केलं. गेंड्याची कातडी असलेला आणि ज्याच्यामुळे देशाला किड लागली आहे असा हा पक्ष आहे.  काँग्रेसने सत्तेत अडसर ठरणाऱ्यांना पध्दतशीरपणे दूर सारलं. आता भ्रष्टाचारा विरोधात देशभर जन आंदोलन उभं करणाऱ्या टीम अण्णांमध्ये फूट पाडण्यासाठी रोज नवे डावपेच लढवले जात आहेत. आणि हे सर्व करताना आपला त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असं काँग्रेस भासवत आहे. हीच या पक्षाची सर्वात मोठी खासियत आहे. टीम अण्णांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न पध्दतशीरपणे केले जात आहेत.

 

प्रशांत भूषण यांचे वक्तव्य  व्यक्तीगत स्वरूपाचे होते, तरीही त्यात अण्णांना ओढण्यात आलं. वास्तविक प्रशांत भूषण यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी अण्णांचा दुरान्वयेही संबंध नाही. अरविंद केजरीवाल यांना इन्कम टॅक्स विभागाच्या नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर किरण बेदी यांनी सवलतीचा लाभ घेतलेल्या विमान प्रवासाबाबत वादंग माजवण्यात आला. या संदर्भात ज्या वर्तमानपत्राने प्रमुख भूमिका बजावली आहे त्यांनी एअर इंडियाने अनावश्यक विमान खरेदी प्रकरणी त्याचे समर्थन करणारा एक मोठा लेख प्रकाशीत केला होता. काँग्रेस बदनामीची चिखलफेक करणारी मोहीम राबवत आहे.  या सर्वांचा बोलवता धनी काँग्रेसच आहे.

 

अण्णा आणि टीम अण्णा यांनी केलेले आंदोलन हे आंदोलन नसून ही एक चळवळ आहे. टीम अण्णांचा त्याग हा फार मोठा आहे. आणि याचाच विचार करता आपण साऱ्या भारतीयांनी त्यांना पाठींबा देणं गरजेचं आहे. ज्याप्रकारे बाबा रामदेव यांचे उपोषण दडपण्यात आले त्याचप्रमाणे अण्णांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु जनतेचा असणारा रेटा यापुढे या सरकारला झुकावे लागले.

 

काँग्रेसची सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानेच टीम अण्णांच्या सदस्यांना टार्गेट करण्यात येत आहे.  काँग्रेस लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच हा सारा खटाटोप करत आहे. देशातील कायदे कमकुवत असल्याने आजही कसाब सारखा कैदी भारताचा पाहुणचार झोडतो आहे.  कठोर कायदे आणि त्याची तितकीच परिणामकारक अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे. हे झालं तरच सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल.

 

अण्णांनी केलेली चळवळ ही अत्यंत कौतुकास्पद तर आहेच मात्र त्याचसोबत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले पाहिजे कारण की, काँग्रेस सरकारसारख्या निगरगठ्ठ लोकांना दिलेली धडक अगदीच जोरदार होती. पण आता घरचेच भेदी होऊ लागले तर मात्र परिस्थितीचे गांर्भीय ओळखलेच पाहिजे. होय घरचेच भेदी स्वामी अग्निवेश हे काही काळ टीम अण्णांचे सदस्य होते. आणि आता तेच  बाहेर  पडून टीम अण्णाचें खच्चीकरण करण्याचाच हा एक केविलवाणा प्रयत्न.

 

शब्दांकन - रोहित गोळे