www.24taas.com, लंडन
ब्रिटनच्या संशोधकांच्या संशोधनाला यश मिळालं असून आता लवकरच डॉक्टर्स हिरड्यांमध्ये नवे दात उगवू शकतील. विकसित केलेल्या नव्या तंत्रामुळे पडलेल्या दातांच्या जागी वयाच्या कुठल्याही वर्षी नवे दात उगवू शकतील.
किंग्ज कॉलज, लंडन येथे यासंदर्भात प्रयोग केला गेला. सुरूवातीला उंदरांच्या हिरड्यांवर हा प्रयोग करून पाहिला. आणि उंदरांच्याही तोंडान दात उगवले. त्यावरून या प्रयोगाला यश मिळत असल्याचं सिद्ध झाले. यानंतर काही म्हातारपणामुळे दात पडलेल्या वृद्ध लोकांच्या हिरड्यांवर हा प्रयोग सुरू आहे. या प्रयोगालाही यश मिळण्याची सुचिन्हं दिसू लागली आहेत.
अजूनही ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही काळ जावा लागणार आहे. मात्र रसायनांच्या सहाय्याने नवे दात येऊ शकतात, हहे सिद्ध झालं आहे. त्यामुळे यापुढे लोकांना कवळी वापरण्याची गरज पडणार नाही. किंवा सिमेंटचे दात, सोन्याच्या कॅप्स यासारख्या गोष्टी बंद होतील. मात्र अशा प्रकारे दात उगवणं अत्यंत महागडं असणार आहे. तसंच बत्तीस दातांसाठी या गोष्टीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे हे तंत्र विकसित झाल्यावरही त्याला किती यश लाभेल, हे आत्ता सांगणं कठीण आहे.