नवी दिल्ली : ही बातमी आहे तुमच्या कामाची. देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला 112 हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय.
पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी 112 हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी 100, अग्निशमन दलासाठी 101, ऍम्ब्युलन्ससाठी 102 आणि आपत्कालीन संकटासाठी 108 हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ 112 हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.
ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील 911 आणि इंग्लंडमधील 999 या इमरजन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही 112 हा एकच इमरजन्सी नंबर असणार आहे.
तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे 112 या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल. त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर 112 नंबर सेव्ह करता येईल.