www.24taas.com, नवी दिल्ली
देशातील मान्यताप्राप्त आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’ या संस्थांमधील प्राध्यापकांच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा या रिकाम्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आलीय.
सरासरी ४३ टक्के जागा या अशा संस्थांमध्ये रिकाम्या असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये वाराणसीच्या ‘आयआयटी-भू’मध्ये सर्वाधिक ५७ टक्के जागा या रिकाम्या आहेत. त्या खालोखाल आयआयटी दिल्लीमध्ये सुमारे ५० टक्के जागा रिकाम्या आहेत. शिक्षण मंत्रालयाने इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडीच्या उमेदवारांची संख्या कमी असल्याचं कारण या जागा कमी असण्यासाठी दिलंय. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे पीएच.डी किंवा क्लासेस घेण्यापेक्षा कॉर्पोरेट जॉब्सना प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये प्राध्यापकांचा तुटवडा निर्माण होताना दिसतोय.
आयआयटीपेक्षा एनआयटीमध्ये परिस्थिती आणखी गंभीर आहे. अनेक एनआयटीमध्ये प्राध्यापकांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा मोकळ्या आहेत. बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचा फटका नव्याने तयार झालेल्या आयआयटी आणि एनआयटीलाही बसतोय.