चित्तूर : आंध्रप्रदेशात तिरुपतीजवळ झालेल्या एका विचित्र अपघातात १४ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. चित्तूर जिल्ह्यात येरपाडू इथल्या पोलीस ठाण्याबाहेर मुनागाला पालेम या गावातले ४० नागरिक तक्रार करण्यासाठी आले होते. त्यावेळी एका वेगवान लॉरीनं या जमावाला जोरदार धडक दिली.
लॉरीनं विजेचा खांब पाडल्यामुळे अपघातात अडकलेल्यांवर उच्च दाबाच्या वीजेच्या तारा पडल्यामुळे त्यांना शॉकही बसला. तसंच तिथं असलेल्या दोन दुचाकींनी पेट घेतला. यामध्ये ४ महिलांसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
गावातल्या रेतीमाफियांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे गावकरी पोलीस ठाण्यात आले होते. याचं वार्तांकन करण्यासाठी आलेले तीन स्थानिक पत्रकारही अपघातात अडकले. तिघं जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.