अलीगड : मुलींमुळे महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील मुलांची गर्दी नेहमीपेक्षा अधिकपटीने वाढते, असा अबज तर्क अलीगड मुस्लीम युनिवर्सिटीने मांडला आहे.
एवढंच नाहीतर अलीगड विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मुलींना ग्रंथालयात प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे मौलाना आझाद हे प्रशस्त ग्रंथालय असून यामध्ये हजारो विद्यार्थी बसून अभ्यास करु शकतात. पण विद्यापीठांतर्गत येणाऱया महिला महाविद्यालयातील मुलींना या ग्रंथालयाचे सदस्यत्व दिले जात नाही.
विद्यार्थींनीच्या उपस्थितीमुळे मुले 'आकर्षित' होऊ शकतात, विद्यार्थिनींमुळे ग्रंथालयातील मुलांची गर्दी जवळपास चार पटीने वाढण्याची शक्यता आहे, असे वादग्रस्त विधान अलीगड विद्यापीठाचे कुलगुरू जमीरुद्दीन शहा यांनी केले. कुलगुरूंच्या या विधानावर महिला संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर कुलगुरूंना बहुधा त्यांची चूक लक्षात आली आणि खरंतर प्रश्न मुलींवरील प्रवेशबंदीचा नसून जागेच्या कमतरतेचा असल्याची सारवासारव त्यांनी केली.
विद्यापीठांच्या कुलगुरूंचे विधान दुर्देवी असून अशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया डेमोक्रॅटिक महिला असोसिएशनच्या सचिव जगमती संगवान यांनी केली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख बरखा शुक्ला यांनीही या विधानाचा निषेध व्यक्त करत यावरून विद्यापीठाच्या कुलगुरूंची संकुचित मानसिकता लक्षात येते अशी टीका केली आहे.
महिला महाविद्यालयातील ग्रंथालयापेक्षा मुलांच्या विद्यापीठात असलेल्या या मौलाना आझाद ग्रंथालयात विपूल ग्रंथसंपदा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी या ग्रंथालयामध्ये प्रवेश दिला जावा यासाठी मागणी करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.