www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अरुंधती भट्टाचार्य यांनी सोमवारी भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची कारभाराची सूत्रं हाती घेतलीत. त्यामुळे, अरुंधती या देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या म्हणजेच ‘स्टेट बँके’च्या पहिल्याच महिला अध्यक्ष ठरल्यात.
यापूर्वी, ५७ वर्षीय अरुंधती भट्टाचार्य यांनी एसबीआयच्या व्यवस्थापक संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही कार्यभार हाताळलाय. ३० सप्टेंबर रोजी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी हे सेवानिवृत्त झाले त्यानंतर अरुंधती यांची या पदावर नेमणूक करण्यात आलीय.
१९७७ साली या एसबीआयमध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. बँकेतील आपल्या ३६ वर्षांच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी उप-व्यवस्थापकीय संचालक, कॉर्पोरेट विकास अधिकारी, मुख्य व्यपस्थापकीय संचालक (बंगळुरू सर्कल) आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक (नवे व्यवसाय) या पदांची जबाबदारी पार पाडलीय. तसंच, त्यांनी आपल्या कार्यकाळात न्यूयॉर्कच्या ऑफिसमध्ये देखरेख अधिकारी म्हणूनही कारभार हाताळला.
‘एसबीआय’ची सहाय्यक कंपनी ‘एसबीआय कॅपिटल मार्केटस् लिमिटेड’च्या अध्यक्षपदावरही त्यांनी काम केलंय. बँकेच्या जनरल इन्शुरन्स सब्सिडिअरी, कस्टोडिअल सब्सिडिअरी आणि एसबीआय मॅक्वारी इन्फ्रास्टक्चर फंड या तीन प्रमुख सहाय्यक कंपन्यांच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.