www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान 7 रेसकोर्स रोडवर सध्या लगबग सुरू आहे, ही लगबग पंतप्रधानांच्या सामानाच्या आवरा आवर आहे.
नवीन लोकसभा अस्तित्वात येण्यास अवघे आठ दिवस उरले आहेत, या लगबगील निवांतपणा आणि निरोपाची झालर आहे.
निकालाची प्रतिक्षा करण्याची तशी कोणतीही इच्छा डॉ.मनमोहनसिंह यांची नसेल, कारण यंदाच्या लोकसभेची मुदत संपली, की राजकारणातून निवृत्ती घेणार आहे, असं पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यापूर्वीच जाहीर केलंय. त्यामुळे 16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, की नवे सरकार अस्तित्वात येण्याची गडबड सुरू होईल.
ही प्रक्रिया आता केवळ आठ दिवसांवर आली आहे. त्यामुळे या आठ दिवसांमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि "7, रेसकोर्स रोड` या दोन्ही ठिकाणी आवराआवर सुरू झाली आहे.
पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयाला भेट म्हणून मिळालेली पुस्तके आणि इतर वस्तूंची काळजीपूर्वक व्यवस्था लावण्याचे काम सध्या सुरू आहे.
"नव्या पंतप्रधानासाठी कार्यालय नेहमीप्रमाणे व्यवस्थित असावे, अशी डॉ. मनमोहनसिंग यांची इच्छा आहे,`` असे पंतप्रधान कार्यालयातील एका सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
गेली दहा वर्षे डॉ. मनमोहनसिंग यांचे अधिकृत निवासस्थान "7, रेसकोर्स रोड` हेच आहे. आता निवृत्ती घेतल्यानंतर ते "3, मोतीलाल नेहरू मार्ग` या निवासस्थानी जाणार आहेत. पूर्वी हा बंगला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे होता.
पंतप्रधान किंवा त्यांच्या कार्यालयाला भेट म्हणून मिळालेली तैलचित्रे, पुस्तके, फुलदाण्या, शोभेच्या वस्तू इत्यादींची व्यवस्थित यादी करून त्यांची व्यवस्था लावण्याचे काम सध्या सुरू आहे.
या वस्तूंसह परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या वस्तू सरकारी खजिन्यात जमा केल्या जाणार आहेत. या सर्व वस्तूंची यादी लवकरच परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध केली जाईल.
कामामध्ये व्यग्र असतानाही डॉ. मनमोहनसिंग यांनी पुस्तके वाचण्याची आवड कटाक्षाने जपली. दहा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना शेकडो पुस्तके भेट म्हणून मिळाली. यापैकी त्यांना कोणती पुस्तके सोबत न्यायची आहेत, याचीही यादी करण्याचे काम सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कॅमरॉन यांनी दिलेली बॅट
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना क्रिकेटची एक बॅट भेट म्हणून दिली होती. "ही मैत्रीची आठवण आहे` असे उद्गार कॅमेरॉन यांनी काढले होते. "तुम्ही कायम सत्तेत राहणार नाही; मीदेखील सत्तेत नसेन.. पण ही भेट म्हणजे आपल्या मैत्रीची एक आठवण असेल,` असे कॅमेरॉन म्हणाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.