नवी दिल्ली : भारतात अनेक ठिकाणी बॉम्बस्फॉटासहीत इतर दहशत कारवाया करण्याच्या आरोपांखाली सध्या अटकेत असलेला ‘आयएम’चा कार्यकर्ता यासीन भटकळनं सोमवारी स्थानिक न्यायालयाकडे आपल्याला चांगली वागणूक मिळावी, यासाठी एक अर्ज सादर केलाय.
इंडियन मुजाहिद्दीनचा सह-संस्थापक यासीन भटकळ यानं सोमवारी स्थानिक न्यायालयात दावा केलाय की, तिहार जेलमध्ये त्याला ‘प्राण्यांहून वाईट वागणूक दिली जातेय’. भटकळनं आरोप केलाय की, रमजानच्या ‘पाक’ महिन्यातही त्याला चांगलं जेवण दिलं जात नाही.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश राज कपूर यांच्या न्यायालयासमोर भटकळचा हा दावा सादर करण्यात आल्यानंतर, न्यायालयानं तिहार जेलच्या अधिकाऱ्यांना 23 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. आपल्या अर्जात भटकळनं आपल्याला अजूनही तिहारच्या जेल नंतर – 02 मध्ये ठेवण्यात आल्याचं म्हटलंय.
भटकळनं केलेल्या दाव्यानुसार, त्याला अजूनही इतरांपासून वेगळं ठेवण्यात येतं. आपल्याला आपल्या सेलबाहेर पडण्याचीही परवानगी दिली जात नाही. न्यायालयासमोर सादर करण्याच्या वेळे व्यतिरिक्त आपल्याला सूर्याचा उजेडही दृष्टीस पडू दिला जात नाही.
भटकळनं वकील एम एस खान यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात, ‘रमजानचा महिना असल्यानं याचिकाकर्ता रोजा पाळतोय. या दिवसांतही त्याला योग्य जेवण दिलं जात नाहीय... आणि जे जेवण दिलं जातं तेही वेळत दिलं जात नाही’ असं म्हटलंय. आपल्याला ताज्या हवेत श्वासही घेऊ दिला जात नसल्याचं सांगत आपल्याला जनावरांहून वाईट वागणूक मिळतेय, असा दावा भटकळनं केलाय.
भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना राष्ट्रीय चौकशी समितीनं गेल्या वर्षी 28 ऑगस्ट रोजी भारत-नेपाळच्या सीमेवर अटक केली होती. हे दोघंही भारतात अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील आरोपी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.