www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यावर ` मोक्का ` खाली दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्यात सीबीआय तशी परवानगी सुप्रीम कोर्टात मागण्याची शक्यता आहे.
सालेमचे प्रत्यार्पण झाले तेव्हा त्याला मृत्यूदंड वा २५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या कलमांखाली कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन भारताने पोर्तुगालला दिले होते. मात्र प्रत्यक्षात सालेम ताब्यात मिळाल्यानंतर मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी सालेमवर गंभीर कलमे लावली. तसेच मुंबई पोलिसांनी त्याच्यावर ` मोक्का` अंतर्गत कारवाई केली. त्यावरुन पोर्तुगालने जोरदार आक्षेप नोंदवला होता. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत येऊन नये म्हणूनच सीबीआय सावध झाली आहे.
सीबीआयने याबाबत कायदेशीर मत जाणून घेतले असता सालेमवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.